नांदगाव : संपूर्ण कोकणातील ७२० किलोमीटरच्या सागरी किनाऱ्यावर कोळी बांधवांची वस्ती असून मासेमारी हा प्रमुख व्यवसाय प्रामाणिक व निष्ठापूर्वक करून आपल्या कुटुंबाचे उदरनिर्वाह करत असतात. या कोळीबांधवांचा आवडता सण म्हणजे होळी आहे. प्रचंड उत्साहात व आनंदात हा सण साजरा केला जातो.संपूर्ण मुरुड तालुक्यात ६५० होड्या असून सुमारे १२ हजारांच्यावर वर लोक या होड्यांद्वारे मासेमारी करत असतात. जसजसी होळी हा सण जवळ येतो, तसतसे फार दूरवर मासेमारी करावयास गेलेल्या होड्या किनाऱ्यावर लागतात. मासेमारी करताना खूप मासळी सापडली तर त्या होडीतील सर्व काम करणाऱ्या कोळीबांधवास चांगला मोबदला मिळतो. खोल समुद्रात मिळालेली ही मासळी मुंबई येथे विकून आपल्या मूळ गावी परतताना होड्या रंगीबेरंगी कपड्याने सजवल्या जातात. ढोल-ताशांच्या गजरात व फटाक्यांची आतषबाजी करत होड्या किनाऱ्याला लागतात. किनाऱ्यावर आल्यावर होडीमध्ये असलेले सर्व कोळीबांधव आपल्या कुटुंबासोबत होळीच्या तयारीला लागतात. आनंद व उत्साह यांचा संगम असलेला होळी सण कोळी समाजासाठी पर्वणीचा आहे. सर्व होड्या किनाऱ्यावर आल्याने मासळीचा तुटवडा मात्र काही दिवस खवय्यांना सहन करावा लागतो. त्यामुळे मासळीचे भाव गगनाला भिडण्याची शक्यता आहे.
शिमगोत्सवासाठी होड्या किनाऱ्यावर
By admin | Published: February 28, 2015 10:57 PM