लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाने राज्यात हाहाकार उडविलेला असताना शनिवारी रात्रीपासून राज्यात रेमडेसिविर इंजेक्शनच्या निमित्ताने सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये जोरदार शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. संकटकाळात सत्ताधारी राजकारण करत आहेत. पुरवठादारांवर दबाव टाकला जात असल्याचा आरोप भाजपने केला आहे, तर भाजप नेते पोलिसांवर दबाव टाकून साठेबाजांना वाचविण्याचा प्रयत्न करत असल्याचा प्रत्यारोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला आहे.
रेमडेसिविरच्या निमित्ताने राज्यातील नेते एकमेकांना भिडले असतानाच त्याचे तीव्र पडसाद समाजमाध्यमांतही उमटले आहेत. थेट देशपातळीवरील नेते, पाठीराख्यांनी दावे-प्रतिदावे करत छेडलेल्या तुंबळ लढाईमुळे रविवारी सायंकाळपर्यंत अक्षरशः लाखो ट्वीटस्, पोस्टचा खच सोशल मीडियावर पडला.
मुंबई पोलिसांनी शनिवारी रात्री ब्रुक फार्मा कंपनीच्या राजेश डोकानिया यांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्यापासून या वादाला सुरुवात झाली. दमण येथील या कंपनीने महाराष्ट्रासाठी भाजपला ५० हजार रेमडेसिविर देण्याचे कबूल केले होते. या कंपनीच्या मालकाला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळताच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, पराग अळवणी आदी नेत्यांनी मध्यरात्री पोलीस स्थानकात धाव घेतली. यावेळी फडणवीस यांनी पोलिसांना धारेवर धरत अशा प्रकारे अटकेची कारवाई करता येणार नाही, असे सांगितले.
सरकारमधील मंत्र्याच्या ओएसडीने फोन करून धमकी दिल्याचा आमच्याकडे पुरावा -फडणवीस
भाजपच्या नेत्यांना इंजेक्शन्स दिली म्हणून कारवाई होऊ शकत नाही. आमच्याकडे अन्न व औषध प्रशासानाची (एफडीए) परवानगी होती. ठाकरे सरकारमधील मंत्र्याच्या ओएसडीने डोकानिया यांना फोन करून धमकी दिल्याचा पुरावाही आमच्याकडे आहे, असेही फडणवीस म्हणाले.
संकटकाळात महाविकास आघाडी सरकारला राजकारण सुचत आहे -दरेकर
राज्यातील तुटवडा लक्षात घेत रेमडेसिविर आणायला मदत करत असताना आडकाठी केली जात आहे, हे इंजेक्शन आम्ही राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून राज्याच्या जनतेला देणार होतो. अन्न व औषध प्रशासनमंत्र्यांना तशी माहिती दिली होती. आवश्यक परवानग्या मिळवून दिल्या. मात्र, संकटकाळात महाविकास आघाडी सरकारला राजकारण सुचत असल्याचा आरोप प्रवीण दरेकर यांनी केला.
राज्यात रेमडेसिविरचा साठा मिळू नये यासाठी भाजपचा प्रयत्न -मलिक
रात्रीच्या वेळी पोलीस स्टेशनमध्ये दोन विरोधी पक्षनेते व दोन आमदार साठेबाजाला वाचवण्यासाठी जातात, यामागे काहीतरी काळेबेरे आहे. राज्यात रेमडेसिविरचा साठा मिळू नये यासाठी भाजपचा प्रयत्न आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी केला. डोकानिया याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर राज्यातील भाजप का घाबरली? राज्यातील भाजप वकिली करण्यासाठी का जाते, याची उत्तरे मिळायला हवीत, अशी मागणीही मलिक यांनी केली.
भाजप नेते मुंबई पोलिसांवर दबाव टाकत आहेत -सचिन सावंत
एका व्यावसायिकासाठी भाजप नेते मुंबई पोलिसांवर दबाव टाकत आहेत. रेमडेसिविरच्या ६० हजार इंजेक्शनचा मोठा साठा ब्रुक लॅबोरेटरीजच्या निर्यातदारांकडे लपवल्याची माहिती मुंबई पोलिसांकडे होती, असा दावा काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला.
नवीन कायदा आला आहे का? -जयंत पाटील
राज्य सरकार, स्थानिक अधिकारी आणि पोलिसांना माहिती न देता रेमडेसिविरसारखे औषध भाजपवाले कसे खरेदी करू शकतात? नवीन कायदा आला आहे का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केला. साठेबाजाला चौकशीला बोलावून दोन तास चौकशी केल्याबद्दल पाटील यांनी पोलिसांचे कौतुकही केले.
.............................
.......................