Join us

यावरसा शिमगो जोरात कोकनाक जादा गाड्यो, ३ ते १२ मार्चदरम्यान एसटीची सेवा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2023 1:30 PM

सुरक्षित प्रवासासाठी प्रवाशांनी एसटीच्या बसमधून प्रवास करावा, असे आवाहनही महामंडळातर्फे करण्यात आले आहे.

मुंबई : शिमगोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची गैरसोय होऊ नये यासाठी एसटी महामंडळाने नियमित बसव्यतिरिक्त २५० जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ३ ते १२ मार्च २०२३ दरम्यान या गाड्या कोकणातील मार्गावरून धावणार आहेत, अशी माहिती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली. सुरक्षित प्रवासासाठी प्रवाशांनी एसटीच्या बसमधून प्रवास करावा, असे आवाहनही महामंडळातर्फे करण्यात आले आहे. गणेशोत्सवाबरोबरच होळी अर्थात शिमगा सणही कोकणात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या सणासाठी मुंबईहून लाखो चाकरमानी कोकणातील आपापल्या गावी जात असतात. त्यामुळे या सणाच्या काळात प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. अशा प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी एसटी सज्ज झाली असून महामंडळाने यंदा २५० जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. एसटी महामंडळाच्या अधिकृत सेवेद्वारे प्रवाशांना आगाऊ आरक्षण करता येईल, असेही एसटी महामंडळाने कळविले आहे.

एसटी कुठून सुटणार?मुंबई सेंट्रल, परळ, कुर्ला, बोरिवली, ठाणे, वसई, नालासोपारा, तसेच पनवेल येथील बसस्थानकांतून खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सावंतवाडी, मालवण आदी भागांसाठी जादा बस सोडण्यात येणार आहेत. 

टॅग्स :कोकण