Join us

चाकरमान्यांचाे शिमगो यंदा जोरात; कोकणासाठी एसटीच्या २७० जादा बसेस हाउसफुल्ल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2023 7:15 AM

लाेकमत न्यूज नेटवर्कमुंबई : गणपती उत्सवापाठोपाठ होळीचा उत्सवदेखील कोकणच्या चाकरमान्यांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असतो. मुंबई, ठाणे, पालघर या ...

लाेकमत न्यूज नेटवर्कमुंबई : गणपती उत्सवापाठोपाठ होळीचा उत्सवदेखील कोकणच्या चाकरमान्यांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असतो. मुंबई, ठाणे, पालघर या भागातून अनेक चाकरमानी आपल्या कुटुंबासह होळीचा सण साजरा करण्यासाठी आपल्या मूळ गावी कोकणात जातात. कोणत्याही वाहतूक सुविधेपेक्षा कोकणच्या चाकरमान्यांना एसटी अधिक जवळची वाटते. कारण ती त्यांना थेट त्यांच्या वाडी-वस्त्यांवर पोहोचविते. यंदा कोकणात जाणाऱ्या एसटीच्या २७० जादा बसेस हाऊसफुल्ल झाल्या आहेत. 

 यंदा होळीनिमित्त कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी एसटी महामंडळाने नियमित बससोबतच २५० जादा बसगाड्या सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला, त्यामुळे आणखी २० गाड्या वाढवाव्या लागल्या. त्या गाड्यादेखील फुल्ल झाल्या आहेत. दरम्यान, सुरक्षित प्रवासासाठी प्रवाशांनी एसटीच्या बसमधून प्रवास करावा, असे आवाहन एसटी महामंडळातर्फे करण्यात आले आहे.  

विविध सणांचे निमित्त साधून मुंबईतून मोठ्या संख्येने नागरिक कोकणात जात असतात. त्यामुळे या सणांच्या काळात प्रवाशांची संख्या वाढते. होळीनिमित्त कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी एसटी महामंडळ सज्ज झाले आहे.  मुंबई सेंट्रल, परळ, कुर्ला, बोरिवली, ठाणे, वसई, नालासोपारा, पनवेल आदी स्थानकांतून खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सावंतवाडी, मालवण या भागात जादा बस सोडण्यात येणार आहेत. 

टॅग्स :एसटी