- जमीर काझी, मुंबईशीना बोरा हत्या प्रकरणाच्या तपासात निष्काळजीपणा केल्याप्रकरणी मध्य प्रादेशिक विभागाचे अप्पर आयुक्त आर.डी.शिंदे यांच्यासह चार अधिकाऱ्यांवर कारवाई अटळ असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी त्याबाबतचा तपास अहवाल गृह विभागाला सादर केला आहे. संबंधित अधिकाऱ्यांवर येत्या काही दिवसांमध्ये निलंबनाची कारवाई शक्य आहे, असे गृह विभागातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. आर. डी. शिंदे हे त्यावेळी रायगड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक होते. त्यांच्यासह पेण विभागाचे तत्कालिन उपअधीक्षक प्रदीप चव्हाण, वरिष्ठ निरीक्षक सुरेश मिरगे व उपनिरीक्षक संदीप दांडे यांनी याप्रकरणाच्या तपासात कसूर केली आहे. शिंदे यांच्या सूचनेनुसार अन्य अधिकाऱ्यांनी याप्रकरणात दुर्लक्ष केल्याचे अहवालात नमूद करण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.या प्रकरणात माजी पोलीस महासंचालक संजीव दयाल यांनी यापूर्वी अहवाल पाठविला होता. मात्र तो अपुरा व त्रोटक असल्याने पुन्हा नव्याने मागविण्यात आला होता. शीना बोरा हत्येप्रकरणी आत्तापर्यंत तिची आई इंद्राणी मुखर्जी तसेच इंद्राणीचा दुसरा व तिसरा पती अनुक्रमे संजीव खन्ना व पीटर मुखर्जी आणि कार चालक श्याम रॉय यांना अटक करण्यात आलेली आहे. इंद्राणीने खन्ना व रॉय यांच्या मदतीने शीना बोरा हिची २४ एप्रिल २०१२मध्ये हत्या केल्यानंतर रायगड येथील पेण गावातील निर्जनस्थळी तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला होता. महिन्याभरानंतर मानवी शरीराचा काही भाग व हाडे आढळल्यानंतरही पेण पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल करण्याची किंवा अपघाती मृत्यूची नोंदही घेतली नव्हती. केवळ डायरीवर नोंद घेत हे प्रकरण मिटविण्यात आले होते. आॅगस्ट महिन्यात खार पोलिसांकडून शीना बोरा हिच्या खूनाचा उलगडा झाल्यानंतर पेण पोलिसांची हलगर्जीपणा चव्हाट्यावर आला. त्याबाबत तत्कालिन पोलीस अधीक्षक आर.डी. शिंदे यांनी आपल्याला सूचना केल्याने त्याबाबत काहीही कार्यवाही केली नसल्याचे जबाब तत्कालिन प्रभारी निरीक्षक सुरेश मिरगे यांनी दिला आहे. त्यांच्यासह ड्यूटी अधिकारी उपनिरीक्षक दांडे, उपअधीक्षक प्रदीप चव्हाण यांनीही वरिष्ठांच्या दबावामुळे आपले कर्तृव्य निटपणे पार पाडले नाही. आर.डी. शिंदे यांनी अधिकाराचा गैरफायदा घेत प्रकरण दाबून टाकण्याचा प्रयत्न केल्याचे स्पष्ट होते, असे पोलीस महासंचालकांच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.पीटरच्या न्यायालयीन कोठडीत वाढशीना बोरा हत्याप्रकरणातील आरोपी पीटर मुखर्जीच्या न्यायालयीन कोठडीत विशेष सीबीआय न्यायालयाने २८ डिसेंबरपर्यंत वाढ केली. तर घरचे जेवण मिळावे, यासाठी पीटरने सोमवारी विशेष न्यायालयात अर्ज केला. या अर्जावर मंगळवारी निर्णय घेण्यात येणार आहे. पीटरला १ डिसेंबर रोजी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. त्याची न्यायालयीन कोठडी सोमवारी संपत असल्याने त्याला विशेष सीबीआय न्यायालयात हजर करण्यात आले. न्या. आर. व्ही. अदोणे यांनी पीटरच्या न्यायालयीन कोठडीत २८ डिसेंबरपर्यंत वाढ केली. पीटरने त्याला घरचे जेवण मिळावे, यासाठी न्यायालयात अर्ज केला. पीटरची औषधे सुरू आहेत. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच त्याला आहार घेणे आवश्यक आहे. सीबीआय कोठडीत असताना आहाराची काळजी घेतली होती. कारागृहात व्यवस्थित आहार मिळत नसल्याने घरचे जेवण देण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती पीटरच्या वकिलांनी केली.
शिंदे यांच्यासह चौघा अधिकाऱ्यांवर ठपका?
By admin | Published: December 15, 2015 2:24 AM