Join us

मनसे नेतेपदावरून शिंदे, पारकर यांना हटविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 5:14 AM

गेल्या काही वर्षांपासून मनसेमध्ये निष्क्रिय असलेले मनसेचे सरचिटणीस शिरीष पारकर व शिवसेनेत जाण्याची चर्चा सुरू असलेले मनसेचे नेते शिशिर शिंदे यांना मनसेने नवीन कार्यकारिणीतून हटविले आहे.

मुंबई : गेल्या काही वर्षांपासून मनसेमध्ये निष्क्रिय असलेले मनसेचे सरचिटणीस शिरीष पारकर व शिवसेनेत जाण्याची चर्चा सुरू असलेले मनसेचे नेते शिशिर शिंदे यांना मनसेने नवीन कार्यकारिणीतून हटविले आहे. मनसेने १० नेते व १२ सरचिटणिसांची यादी निवडणूक आयोगाकडे सादर केली, त्यामध्ये हे बदल करण्यात आले आहेत.मनसेतर्फे विधानसभेवर निवडून गेलेले माजी आमदार शिशिर शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यानंतर, शिंदे हे मनसे सोडून शिवसेनेत प्रवेश करतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. शिंदे यांना मनसेने नेतेपदावरून हटविल्याने त्यांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चेला पुन्हा उधाण आले आहे. मनसेने निवडणूक आयोगास सादर केलेल्या यादीप्रमाणे पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे राहतील.मनसेचे नेते म्हणून माजी आमदार बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, शिरीष सावंत, संजय चित्रे, दीपक पायगुडे, अनिल शिदोरे, जयप्रकाश बाविस्कर, प्रमोद पाटील व अभिजित पानसे यांची निवड केली आहे.अविनाश अभ्यंकर हे नेतेपदी असून, पक्षाचे खजिनदार म्हणून काम पाहतील. पक्षाचे सरचिटणीस म्हणून मनोज चव्हाण, आदित्य शिरोडकर, माजी आमदार परशुराम उपरकर,हेमंत गडकरी, बाबा जाधवराव, प्रकाश भोईर, राजेंद्र शिरोडकर, राजीव चौगुले, संदीप देशपांडे, शालिनी ठाकरे, रिटा गुप्ता व अशोक मुर्तडक या १२ जणांची निवड करण्यात आली आहे.ही निवड प्रक्रिया २० मे रोजी पार पडली व ३० मे रोजी निवडणूक आयोगास कळविण्यात आल्याची माहिती शिरीष सावंत यांनी दिली. ही कार्यकारिणी पुढील पाच वर्षांसाठी म्हणजे सप्टेंबर २०२२ पर्यंत अस्तित्वात राहील.

टॅग्स :राज ठाकरेमनसे