'उद्धव ठाकरेंनी दसरा मेळावाही घरी बसून ऑनलाइन पद्धतीने घ्यावा'; शिंदे गटाचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2022 07:55 PM2022-09-19T19:55:35+5:302022-09-19T20:00:27+5:30
शिंदे गटातील नेत्या शीतल म्हात्रे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.
मुंबई- दसरा मेळाव्यावरुन ठाकरे आणि शिंदे गटात चढाओढ सुरू असताना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. कारण बीकेसीच्या एमएमआरडीएच्या मैदानावर मेळावा घेण्यास शिंदे गटाचा अर्ज स्वीकारण्यात आला आहे. तर बीकेसीतील दुसऱ्या मैदानात शिवसेनेकडून दाखल करण्यात आलेला अर्ज फेटाळण्यात आला आहे. दसरा मेळाव्याकरता बीकेसीतील एक मैदान शिंदे गटानं आरक्षित केलं आहे.
ठाकरे गटाला अद्याप दसरा मेळाव्यासाठी कोणतही मैदान मिळालेलं नाही, त्यामुळे राज्यातील राजकारण आणखी तापण्याची शक्यता आहे. याचदरम्यान शिंदे गटातील शीतल म्हात्रे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. उद्धव ठाकरेंनी दसरा मेळावा घरी बसून ऑनलाईन पद्धतीने करावा, त्यांच्यासाठी हेच योग्य राहील, असं शीतल म्हात्रे यांनी म्हटलं आहे.
शीतल म्हात्रे म्हणाल्या की, दरवर्षी पेक्षा यावर्षी वाजता गाजत हा दसरा मेळावा होणार आहे, कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हा दसरा मेळावा होणार आहे. तसेच आम्हाला परवानगी मिळाली नाही तर, शिवाजी पार्क मैदानात घुसून दसरा मेळावा साजरा करु, अशा धमक्या दिल्या जाताय. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे खंबीर आहेत. त्यामुळे राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ते निर्माण होऊ देणार नाही, असंही शीतल म्हात्रे यांनी सांगितलं.
दरम्यान, एमएमआरडीच्या मुख्य मैदानासाठी शिंदे गटाकून अर्ज दाखल करण्यात आला होता. प्रथम अर्ज करणाऱ्यास प्राधान्य या नियमाअंतर्गत एमएमआरडीएकडून शिंदे गटाला दसरा मेळाव्यासाठी परवानगी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तर शिवसेनेकडून बीकेसीतील दुसऱ्या मैदानासाठी परवानगी मागण्यात आली होती. पण संबंधित मैदान आधीच एका कंपनीकडून कार्यक्रमासाठी आरक्षित केल्यानं ठाकरे गटाची परवानगी नाकारण्यात आली आहे.
दसरा मेळावा ही एक परंपरा- अरविंद सावंत
बीकेसीतील मैदानासाठी प्रथम अर्ज करणाऱ्यास प्राधान्य हाच निकष जर लावण्यात आला असेल तर शीवतीर्थवर दसरा मेळावा घेण्यसाठी आम्हालाच परवानगी मिळायला हवी. कारण शिवसेनेनं पहिला अर्ज दाखल केला आहे, असा दावा शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी केला आहे. आमचा गट वगैरे काही नाही. आम्हीच खरी शिवसेना आहोत आणि एमएमआरडीएवर शिंदे गटाला परवानगी देण्यात आल्याचं मला कळालं. प्रथम येणाऱ्या प्राधान्य या निकषाअंतर्गत त्यांना परवानगी देण्यात आली असेल तर शिवतीर्थवर शिवसेनेलाच परवानगी मिळायला हवी. कारण आम्ही आधी अर्ज दाखल केला आहे. दसरा मेळावा ही एक परंपरा आहे. त्यामुळे मोर्चेबांधणीवगैरे करण्याची आम्हाला गरज नाही. परंपरेनुसार शीवतीर्थवरच शिवसेनेचा मेळावा होईल, असं अरविंद सावंत यांनी म्हटलं आहे.