Join us

'...तर मशाल पेटवून काय बरं करणार आहात?'; शीतल म्हात्रेंचा किशोरी पेडणेकरांना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2022 4:24 PM

शिंदे गटातील नेत्या शीतल म्हात्रे यांनी ठाकरे गटातील नेत्या किशोरी पेडणेकर यांच्यावर टीका केली आहे.

मुंबई- ठाकरे आणि शिंदे वादामध्ये निवडणूक आयोगाने शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह गोठवलं, तसंच दोन्ही गटांना शिवसेना हे नाव वापरण्यावरही बंदी घालण्यात आली. यानंतर आता निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना वेगवेगळी नावं दिली आहेत, तर ठाकरे गटाला निवडणुकीसाठी नवीन चिन्हही दिलं आहे. निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब आणि शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव दिलं आहे. तसंच ठाकरे गटाला धगधगती मशाल हे चिन्ह मिळालं आहे.

ठाकरे गटाला नवीन चिन्ह आणि नाव मिळाल्यानंतर मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी गाण्याच्या माध्यमातून शिंदे गटावर निशाणा साधला आहे. 'काळरात्र होता होता, उषःकाल झाला, अरे पुन्हा शिवसैनिकांनो, पेटवा मशाली', असं गाणं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं. आपल्याला उद्धव बाळासाहेब ठाकरे हे पक्षाचं नाव मिळालं. पहिली लढाई खरी जिंकली. ज्यांनी आपल्या पक्षात काळरात्र करण्याचं ठरवलं तो उष:काल आतापासून सुरू झाला आहे. आयुष्याच्या मशाली पेटवा आणि दाखवा, ही मशाल उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची मशाल आहे', असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

किशोरी पेडणेकरांच्या या विधानावर शिंदे गटातील नेत्या शीतल म्हात्रे यांनी टोला लगावला आहे. मशाली अंधारातून प्रकाशाकडे जाण्यासाठी पेटवल्या जातात...तुमच्याकडे जर उजेड पडला, असेल म्हणजेच उषःकाल झाला असेल, तर  मशाल पेटवून काय बरं करणार आहात?, असा सवाल शीतल म्हात्रे यांनी उपस्थित केला. तसेच सूर्यप्रकाशापेक्षा मशाल प्रखर नसते हे ज्ञान शाळकरी मुलांना देखील माहित असते, असा टोलाही शीतल म्हात्रे यांनी किशोरी पेडणेकरांना लगावला.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात असलेल्या ‘बाळासाहेबांची शिवसेना’ या पक्षाला ‘दोन तलवार व ढाल’ असे निवडणूक चिन्ह मिळाले आहे. तसेच या पक्षाला राज्यातील प्रादेशिक पक्ष म्हणूनही निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे. उद्धव ठाकरे गटाला सोमवारीच मशाल हे चिन्ह मिळाले आहे. हे चिन्ह घरोघर पोहोचविण्याठी या गटाच्या  राज्यभरातील कार्यकर्त्यांनी प्रयत्नही सुरू केले आहेत. 

टॅग्स :किशोरी पेडणेकरशिवसेनाएकनाथ शिंदेउद्धव ठाकरे