Devendra Fadanvis: शिंदेगटाचे आमदार फडणवीसांवर संतापले, विधानसभेत स्पष्टच सांगितले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2022 01:07 PM2022-08-24T13:07:44+5:302022-08-24T13:07:44+5:30
गृहमंत्री फडणवीस यांनी उत्तर दिल्यानंतरही आमदार सुहास कांदे यांनी हे उत्तर गोलमाल असून मी आपल्या उत्तरावर समाधानी नसल्याचे म्हटले.
मुंबई – नाशिकमधील नांदगावचे शिवसेनेचे आमदार सुहास कांदे आणि राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री छगन भुजबळ यांच्यातील जुना वाद पुन्हा नव्याने उफाळून आल्याचं दिसून येत आहे. भुजबळ यांना राज्य सरकारने दोषमुक्त केल्याप्रकरणी आमदार सुहास कांदे सभागृहात चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळाले. यावेळी, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरच ते संतापल्याचं दिसून आलं. देवेंद्रजी, तुम्हाला पाहूनच आम्ही इकडे आलोय, असं त्यांनी सभागृहात जाहीरपणे सांगितलं. तसेच, भुजबळप्रकरणी अपिल का केले नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणी दोषमुक्त करण्यात आल्याप्रकरणी शिंदे गटाचे आमदार सुहास कादे यांनी सभागृहात जोरदार भाषण केलं. या प्रकरणी अपील राज्य सरकारने अपील का केलं नाही, असे म्हणत त्यांनी आपला मुद्दा आक्रमकपणे मांडला. तसेच, गृहमंत्री फडणवीस यांनी उत्तर दिल्यानंतरही आमदार सुहास कांदे यांनी हे उत्तर गोलमाल असून मी आपल्या उत्तरावर समाधानी नसल्याचे म्हटले.
महाराष्ट्र सदन घोटाळा 1160 कोटी रुपयांचा आहे, मात्र हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना हे प्रकरण मागे घेण्यात आले आणि त्यात तत्कालीन मंत्री असलेले नेत्यांना निर्दोष सोडण्यात आले. यासंदर्भात विधी विभागाने एक शासन निर्णय काढला की उच्च न्यायालयात अपील करायचे. मात्र त्याच विधी विभागाने पुन्हा पत्र काढून अपील करण्याची गरज नसल्याचे सांगितले. अस काय झाल की विधी विभागाला आपला निर्णय बदलावा लागला, असा सवाल देखील यावेळी कांदे यांनी उपस्थित केला
गृहमंत्री आपण भ्रष्टाचारविरोधी आहात, पतंप्रधान मोदींनी जे भाषण केलं, त्यात भ्रष्ट्राचार समूळ नष्ट करायचाय, असं त्यांनी म्हटलंय. ११६० कोटी रुपयांचा घोटाळा आहे. देवेंद्र फडणवीसजी आपण दिलेल्या उत्तरावर मी समाधानी नाही. तुम्ही अपीलात जावा हे उत्तर मला हवंय. गृहमंत्री भ्रष्टाचाराला पाठिशी नाही घालतील, असं आम्हाला वाटतंय. अहो आम्ही तुमच्याकडे बघून आलोय. पण, तुम्ही जर अशा भ्रष्टाचाऱ्यांसाठी काढलेले जीआर रद्द का केला जातोय. यापूर्वी महाराष्ट्रात काढलेले जीआर रद्द झाले का? मग हाच जीआर का रद्द होतोय, असा सवाल आमदार सुहास कादे यांनी विधानसभेत विचारला.