३५०व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त शिंदे-फडणवीस सरकार विशेष टपाल तिकीट काढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2023 04:07 PM2023-06-05T16:07:53+5:302023-06-05T16:10:01+5:30
राज्याचे राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत उद्या राजभवनात अनावरण
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या ३५०व्या वर्षांनिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या माध्यमातून राज्यात वर्षभर विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कर्तुत्वाला मानवंदना देण्यासाठी सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र शासनाने भारतीय टपाल विभागाच्या सहकार्याने एक टपाल तिकीट काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मंगळवारी, ६ जूनला राज्याचे राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते राजभवन येथील दरबार हॉलमध्ये समारंभपूर्वक या तिकिटाचे अनावरण होणार आहे.
'छत्रपती शिवाजी महाराज' हा आमच्यासाठी चेतनेचा संचार करणारा प्रेरणामंत्र आहे. कित्येक राष्ट्रनायकांना लढण्याची आणि विजयाची गाढ प्रेरणा देणारे अद्वितीय व्यक्तिमत्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज असून त्यांचा विचार जगभरात जना जनानांत आणि मनामनांत पोहोचविण्याचा दृढ निश्चय महाराष्ट्र सरकारने घेतला असून याचाच एक भाग म्हणून महाराजांवरील पोस्ट तिकीट प्रकाशित करण्याचा निर्णय घेतल्याचे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
शिववंदना कार्यक्रमाचे आयोजन
टपाल तिकीट अनावरणानंतर सांस्कृतिक कार्य संचलनालयाच्या वतीने शिववंदना या सांस्कृतिक कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले आहे.