राज्यातील महापालिका निवडणुकांचे पडघम वाजण्यापूर्वी मतदारांना आकर्षित करण्यासाठी सर्वच पक्षांनी मोट बांधण्यास सुरुवात आहे. त्यामध्ये शिंदे गट व भाजपने आघाडी घेतली आहे. याचीच एक झलक म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मुंबईत 38 हजार कोटींच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण होत आहे. त्या पार्श्वभूमीवर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान मोदी हे अखील विश्वाचे लोकप्रिय नेता असून मुंबईकरांचं मोदींवर सर्वाधिक प्रेम असल्याचं म्हटलं. तर, मोदींचा जगभरात डंका वाजतोय, हे मी दावोसमध्ये अनुभवल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलं. त्यानंतर, मोदींनी मराठीतच आपल्या भाषणाची सुरुवात करत शिंदे-फडणवीस डबल इंजिन सरकारचं कौतुक केलं.
मुंबईतील वांद्रे येथील बीकेसी मैदानावर आज सायं ५ वाजता नरेंद्र मोदींचे आगमन झाले. त्यावेळी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान मोदींचा सन्मान केला. त्यानंतर, भाषणाला सुरुवात करताना मोदी आणि एकनाथ शिंदेंवर कौतुकाचा वर्षाव केला. मोदी हे सर्वाधिक लोकप्रिय नेता आहेत, जर लोकप्रिय नेत्यांची स्पर्धा घेण्यात आली तर मोदींना सर्वाधिक पसंती ही मुंबईकरांची असेल असं फडणवीस म्हणाले. त्यानंतर, मुख्यमंत्री शिदेंनी मोदींचं कौतुक करताना पंतप्रधान मोदींचा जगभरात डंका वाजतोय असे म्हटले. यानंतर मोदींनी बोलताना मोदींनी महाराष्ट्रातील जनतेला विश्वास दिला. शिंदे-फडणवीसांची जोडी तुमचं स्वप्न पूर्ण करेल, असे मोदींनी म्हटले.
मुंबईसाठी बजेटची काहीच कमी नाही, मुंबईच्या हक्काचा पैसा योग्य जागी विनियोग झाला पाहिजे. तो पैसा भ्रष्टाचारात गेला, बँकेत पडून राहिला तर मुंबईचं भविष्य उज्ज्वल कसं असेल?, असा सवाल मोदींनी विचारला. मुबईतील कामं रोखण्याची प्रवृत्ती असेल तर विकास होणार नाही, जनतेला फायदा होणार नाही, असे म्हणत मोदींनी नाव न घेता उद्धव ठाकरेंच्या महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेवर टीका केली. तसेच, राजकीय स्वार्थासाठी भाजपा आणि एनडीएचं सरकार विकासाच्या कामांना ब्रेक लावत नाहीत. पण, मुंबईत असं होताना वारंवार पाहिलं आहे, असेही मोदींनी म्हटले. आपल्या भाषणाच्या शेवटी मोदींनी शिंदे-फडणवीस डबल इंजिन सरकारचे कौतुक केले. तसेच, शिंदे-फडणवीसांची जोडी तुमचं स्वप्न पूर्ण करेल, असा विश्वासही मोदींनी महाराष्ट्रातील जनतेला दिला. दिल्ली ते महाराष्ट्र, महाराष्ट्र ते मुंबई एक सरकार हवंय. फेरीवाल्यांचा धंदा झाला नाही, उसने पैसे घेतलेले होते, ते व्याज देण्यातच जात होते. घरी मुले उपाशी असायची. आता तसे होणार नाही. मिळालेल्या स्वनिधीवर व्याज द्यावे लागणार नाही. तुम्ही एक पाऊल पुढे या मी ११ पावले येण्यास तयार आहे, असेही मोदींनी म्हटले. मुंबईच्या या विकासकामांसाठी मी मुंबईचे, महाराष्ट्राचे आणि मुंबई ही देशाची राजधानी असल्याने देशातील जनतेचे अभिनंदन करतो, असेही मोदींनी म्हटले.
काय म्हणाले मुख्यमंत्री
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आपल्या भाषणात महाविकास आघाडीवर अप्रत्यक्षपणे टीका केली. नाव न घेता त्यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. मविआच्या काळात राज्याचा विकास झाला नाही. ही मेट्रो, रस्ते झाले की ४० लाख वाहनांची कोंडी संपेल, लोक मेट्रोतून वेगाने प्रवास करतील. मुंबई काही वर्षांनी खड्डेमुक्त होईल. रस्ते काँक्रीटच्या कामांची सुरुवात होईल. डांबराचे रस्ते संपतील, २५ ते ४० वर्षे यांना काम मिळणार नाही. काळं पाढरं करणाऱ्या लोकांचे दुकान बंद होईल हे त्यांचे दु:ख आहे, असे शिंदेंनी म्हटले. तसेच, अनेकांची इच्छा होती की, हा कार्यक्रम मोदींच्या हातून होऊ नये. पण, नियतीची वेगळीच खेळी असते. आज त्यांच्या हस्तेच भूमीपूजन आणि लोकार्पण होत आहे, असेही त्यांनी म्हटले.
काय म्हणाले फडणवीस
महाराष्ट्राचे लोकप्रिय आणि जनप्रिय मुख्यमंत्री अशा शब्दात एकनाथ शिंदेंचा उल्लेख केला. दावोस दौऱ्याहून महाराष्ट्रासाठी दीड लाख कोटी रुपयांची गुंतवणूक घेऊन आले आहेत, असेही म्हटले. यावेळी, मोदींनी टाळ्या वाजवून दाद दिली. तसेच, त्यासोबतच, नाव न घेता शिवसेना नेते उद्धव ठाकरेंवर टिका केली. अडीच वर्षांपूर्वी आपल्यासोबत विश्वासघात झाला. पण, बाळासाहेबांचा सच्चा पाईक असलेल्या एकनाथ शिंदेंनी हिम्मत दाखवली आणि राज्यात डबल इंजिन सरकार आलं, असे फडणवीसांनी म्हटलं. फडणवीसांच्या या विधानावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी टाळ्या वाजवून दाद दिली. त्यासोबतच केंद्रीयमंत्री नारायण राणेंनीही टाळ्या वाजवत फडणवीसांच्या भाषणाला दाद दिली.