"राज्यातील शिंदे सरकार जाणार, भूगर्भात जोरदार हालचाली’’, संजय राऊतांचं सूचक विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2022 12:49 PM2022-11-23T12:49:20+5:302022-11-23T12:52:54+5:30
Sanjay Raut: पाच महिन्यांपूर्वी शिंदे सत्तेवर आलेले सरकार अद्याप स्थिर झालेले नाही. त्यातच आता संजय राऊत यांनी एक सूचक विधान करत खळबळ माजवली आहे. शिंदे सरकार जाणार, भूगर्भात जोरदार हालचाली सुरू आहेत, असं विधान संजय राऊत यांनी केलं आहे.
मुंबई - या वर्षाच्या मध्यावर घडलेल्या नाट्यमय घडामोडी आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये झालेल्या बंडानंतर राज्यात शिंदे गट आणि भाजपाचे सरकार सत्तेवर आले होते. मात्र या सरकार विरोधात उद्धव ठाकरे गटाने न्यायालयात धाव घेतल्याने तसेच आक्रमक राजकीय भूमिका घेतल्याने शिंदे सरकार अद्याप स्थिर झालेले नाही. त्यातच आता संजय राऊत यांनी एक सूचक विधान करत खळबळ माजवली आहे. शिंदे सरकार जाणार, भूगर्भात जोरदार हालचाली सुरू आहेत, असं विधान संजय राऊत यांनी केलं आहे.
शिंदे सरकारच्या स्थैर्याबाबत भाष्य करताना संजय राऊत म्हणाले की, कालच रावसाहेब दानवे यांनी विधान केलंय की दोन महिन्यांमध्ये काय होईल सांगता येत नाही. याचा अर्थ त्यांनाही आमच्या हालचालींची बित्तंबातमी लागी असेल. पुढच्या दोन महिन्यांत हे सरकार राहील की जाईल याबाबत त्यांच्या मनात संभ्रम आहे. याचा अर्थ असा आहे की, भूगर्भात काय हालचाली सुरू आहेत. पडद्यामागे काय सुरू आहे, याबाबतची माहिती केंद्रीय मंत्री असल्याने त्यांच्या कानावर गेलेली असावी, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.
यावेळी आदित्य ठाकरे यांच्या तेजस्वी यादव यांच्यासोबतच्या भेटीबाबतही संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, देशातील सगळ्याच तरुण नेत्यांना आदित्य ठाकरेंशी संवाद साधायचा आहे. तो संवाद साधण्यास सुरुवात झाली आहे. आज तेजस्वी यादव संवाद साधत आहे. नंतर अभिषेक बॅनर्जी असतील. त्यानंतर अखिलेश यादव असतील. इतर काही नेते असतील त्यांना आदित्य ठाकरेंशी संवाद साधून देशामध्ये समर्थ पर्याय उभा करायचा आहे. जर आम्ही तशी तयारी करत असू तर त्याच्याकडे एक राज्य म्हणून न पाहता एक राष्ट्रीय राजकारण म्हणून पाहिलं पाहिजे, असे संजय राऊत यांनी सांगितले.