मुंबई - दक्षिण मुंबईतून शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) विद्यमान खासदार अरविंद सावंत यांच्या समोर लोकसभा निवडणूक लढण्यासाठी भाजपाकडून प्रबळ दावा केला जात आहे. भाजपाकडून विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे.
गेले काही दिवस नार्वेकर हे लालबाग-परळ-शिवडी-वरळी येथे रखडलेली विकासकामे मार्गी लावत आहे. पक्ष जी जबाबदारी देईल ती पार पाडेन असेही त्यांनी सांगितले आहे. मात्र आता या जागेवर शिंदे गटाने सुद्धा दावा केला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दक्षिण मुंबईतून मिलिंद देवरा यांना पक्षाने लोकसभेसाठी तयारी करण्यास सांगितल्याची माहिती सूत्रांनी लोकमतला दिली.
मिलिंद देवरा यांची शिंदे गटातून राज्यसभेवर खासदार म्हणून नियुक्ती झाली आहे. ते माजी केंद्रीय मंत्री आणि दोन वेळा खासदार होते. ते शिवसेनेत आल्यापासून दक्षिण मुंबईचे राजकारण बदललेले आहे. दक्षिण मुंबईची पकड असलेला नेता सुशिक्षित आणि पुरोगामी चेहरा अशी त्यांची ओळख आहे. दक्षिण मुंबईचा उद्योजक आणि बाजारपेठांचे त्यांना समर्थन आहे. दक्षिण मुंबई जागा ही शिवसेनच्या खात्यातली असल्याने शिवसेनेने कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना निवडणूकीसाठी कंबर कसायला मुख्यमंत्र्यांनी सांगितले, असल्याची माहिती सूत्रांनी दिली.