Join us

शिंदे गटात पुन्हा नाराजी नाट्य, कदम हटाव मोहीम; ३०० पदाधिकाऱ्यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

By मनोहर कुंभेजकर | Published: August 19, 2023 5:45 AM

रामदास कदम यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत त्यांनी मुख्यमंत्र्यांवर तोंडसुख घेतल्याचे समजते.

मनोहर कुंभेजकर, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : शिंदे गटाचे नेते व माजी मंत्री रामदास कदम यांच्या मुलाच्या मनमानी कारभाराला कंटाळून कांदिवली, चारकोप आणि मालाड येथील ४० पदाधिकाऱ्यांनी गेल्याच आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे राजीनामे सुपूर्द केल्याचा प्रकार ताजा असतानाच आता पुन्हा एकदा शिंदे गटात नाराजी नाट्य रंगले आहे. खुद्द रामदास कदम यांच्याविरोधातच ३०० पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना साकडे घातले आहे.

शिंदे गटाच्या अंधेरी पूर्व, जोगेश्वरी पूर्व, दिंडोशी आणि गोरेगाव येथील ३०० नाराज पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री शिंदे यांची वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. यावेळी पदाधिकाऱ्यांनी आपली कैफियत मांडली. रामदास कदम आम्हाला शिवीगाळ करतात, तुम्हाला पक्षातून काढून टाकेल असा  दम देतात, असे सांगत त्यांना हटवा अन्यथा आम्ही राजीनामे देतो, असे या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले. त्यावर शिंदे यांनी तक्रारीची दखल घेत राजीनामे न देण्याचे आवाहन पदाधिकाऱ्यांना केले. शिवसेना नेते व उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघाचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

रामदास कदम यांनी गुरुवारी बाळासाहेब भवन येथे उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक बोलावली होती. या बैठकीत त्यांनी शिवीगाळ केली, पक्षातून काढून टाकेल, असा दम दिला. बैठक संपल्यावर पदाधिकाऱ्यांनी माझी भेट घेऊन या दमदाटीची सविस्तर माहिती दिल्याचे कीर्तिकर यांनी सांगितले. त्यानंतर अंधेरी व जोगेश्वरी विभागप्रमुख प्रदीप धिवार व गणेश शिंदे यांनी नाराजांसह मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.

कदम यांची ‘वर्षा’वर भाईगिरी

रामदास कदम यांनी गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत त्यांनी मुख्यमंत्र्यांवर तोंडसुख घेतल्याचे समजते. तुम्हाला दिलेली तीन कामे तुम्ही केली नाहीत, असे कदम मुख्यमंत्र्यांना म्हणाले. त्यावर  कोणती कामे केली नाहीत असे विचारत संपूर्ण राज्याचा कारभार पाहावा लागत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी कदम यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यावेळी तिथे उपस्थित असलेले उद्योगमंत्री उदय सामंत यांनी उभयताना अँटी चेंबरमध्ये चर्चा करण्याचे सुचवले असता कदम यांनी त्यांनाही चार शब्द सुनावल्याचे सूत्रांनी सांगितले.

 

टॅग्स :एकनाथ शिंदेरामदास कदमशिवसेना