“नार्वेकर-CM भेटीने आकाश कोसळले का, खोटी सहानुभूती मिळवणे बंद करा”; शिंदे गटाची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2024 08:52 AM2024-01-10T08:52:57+5:302024-01-10T08:55:03+5:30
Mla Disqualification Case Result: उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेला शिंदे गटातील नेत्यांनी प्रत्युत्तर दिले.
Mla Disqualification Case Result: राज्याच्या राजकारणात उलथापालथ घडवणाऱ्या शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल अखेर लागणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हा निकाल देणार आहेत. शिवसेना ठाकरे गट की शिंदे गट यातील कोणाचे आमदार अपात्र ठरणार, की काही वेगळा निकाल लागणार याची उत्सुकता आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातील आरोप-प्रत्यारोप तीव्र झाले असून, दावे-प्रतिदावे केले जात आहेत. उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केलेल्या आरोपांना शिंदे गटाकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे.
शिंदे गटाचे नेते आणि मंत्री दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार केला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट झाली म्हणजे आकाश कोसळले, असे मानण्याचे कारण काय? आपली बाजू लंगडी आहे असे वाटते त्यांनी मतप्रदर्शन करून खोटी सहानुभूती मिळवणे बंद करावे, अशी टीका दीपक केसरकर यांनी केली.
ठाकरे गटाचे अनेक मुद्दे सर्वोच्च न्यायालयाने नाकारले
विधानसभा अध्यक्षांनी आरोपींना भेटणे चुकीचे आहे, असे भाष्य उद्धव ठाकरेंनी करणे चुकीचे आहे. या भेटीत कोणतीही लपवाछपवी नाही. ज्यांची बाजू लंगडी असते, त्यांनाच भिंती वाटते. आम्ही नेहमीच त्यांचा मान ठेवला आहे. स्वत:च्या पक्ष घटनेत परस्पर बदल करणाऱ्यांनी थोडा पेशन्स ठेवावा. ज्यांच्याकडे दोन तृतीयांश बहुमत आहे, त्यांच्यावर दुसरा व्हिप लागू होत नाही. ज्यांच्याकडे पूर्ण बहुमत आहे, त्यांना कोणत्याही पक्षात विलीन होण्याची गरज नाही. ठाकरे गटाचे अनेक मुद्दे सर्वोच्च न्यायालयाने नाकारले आहेत, असे दीपक केसरकर यांनी सांगितले.
दरम्यान, विधानसभा अध्यक्ष विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात निकालाचे वाचन करणार आहेत. ५०० पानांच्या निकालपत्रातून महत्त्वाचे मुद्दे घेऊन एक सारांश निकाल ते वाचून दाखवतील. हा साधारण ५-१० पानांचा सारांश निकाल असेल. त्यानंतर निकालाची मूळ प्रत दोन्ही गटाच्या वकिलांना दिली जाईल.