Join us  

आता उद्धव ठाकरे जे विचार देतील, ते सोनिया गांधींचे विचार असतील; रामदास कदमांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2022 2:19 PM

शिंदे गटातील नेते रामदास कदम यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

मुंबई- शिवाजी पार्कवरील दसरा मेळावा घेण्यापासून कोणत्याही परिस्थितीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना रोखण्याची रणनीती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने आखली असल्याचे सांगण्यात येत आहे. त्या अंतर्गत शिवाजी पार्क ‘फ्रीज’ केले जाण्याची शक्यता आहे. ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटांनी शिवाजी पार्कवर मेळावा घेण्यासाठीचा अर्ज महापालिकेकडे केला आहे. त्यावर महापालिकेने निर्णय घेतलेला नाही. शिवाजी पार्कवरून राजकीय वाद नको, अशी भूमिका घेत महापालिकेने उद्या या दोघांनाही परवानगी नाकारली तर बीकेसीतील मैदानाचा पर्याय शिंदे गटाने खुला ठेवला आहे. 

शिवसेनेचे ४० आमदार, १२ खासदारांनी बंड केले. अनेक जिल्ह्यांमध्येही शिवसेनेत फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच होत असलेला ठाकरेंचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होऊ द्यायचा नाही, अशी रणनीती शिंदे गटाने आखली आहे. याचदरम्यान दसरा मेळाव्यावरुन शिंदे गटातील नेते रामदास कदम यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. 

संपूर्ण देशाला बाळासाहेब ठाकरे एक विचार देत होते. मात्र आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जे विचार देतील ते काँग्रेसच्या प्रमुख सोनिया गांधींचे विचार असतील. त्यामुळे शिवसेना प्रमुखांचे विचार शिवतीर्थावरुन देशभरात पोहचवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा झाला पाहिजे, असं शिंदे गटातील नेते रामदास कदम यांनी म्हटलं आहे. 

शिंदे गटाचा ‘प्लॅन बी’देखील तयार -

शिवाजी पार्कवरच मेळावा होईल यासाठी सर्व ताकद पणाला लावायची; पण पालिकेने वा न्यायालयाने नाकारले तर ‘प्लॅन बी’ म्हणून बीकेसीतील मैदानाचा पर्याय शिंदे गटाने खुला ठेवला आहे. महापालिकेने परवानगी नाकारली वा शिवाजी पार्क फ्रीज केले तर दोन्ही परिस्थितीत उच्च न्यायालयात ठाकरे गट धाव घेईल आणि मग न्यायालयातून फैसला होऊ शकेल. आपला मेळावा शिवाजी पार्कवर झाला नाही तरी चालेल पण कोणत्याही परिस्थितीत उद्धव ठाकरेंना शिवाजी पार्कवर मेळावा घेण्यापासून रोखण्यावर शिंदे गटाचा भर दिसत आहे.

पाच दशकांचे नाते तोडण्याची रणनीती -

महापालिकेने दोघांनाही परवानगी नाकारून दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क ‘फ्रीज’ केले तरी शिंदे गटाला राजकीय यशच मिळेल. कारण, त्या परिस्थितीत उद्धव ठाकरे हे शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेऊ शकणार नाहीत आणि ठाकरे आणि शिवाजी पार्कचा दसरा मेळावा हे पाच दशकांहून अधिक काळापासूनचे नाते तोडता येईल. 

टॅग्स :उद्धव ठाकरेरामदास कदममहाराष्ट्र सरकारसोनिया गांधी