Maharashtra Politics: “एखादा तरी घोटाळा त्यांनी उघड करावा”; शिंदे गटाचे आदित्य ठाकरेंना थेट आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2023 07:38 PM2023-02-27T19:38:58+5:302023-02-27T19:39:34+5:30
Maharashtra News: भाजप-शिंदे गटात भांडणे असून, भाजपच आमच्याकडे शिंदे गटाच्या घोटाळ्यांची माहिती पुरवत असल्याचा दावा आदित्य ठाकरेंनी केला होता.
Maharashtra Politics: एकीकडे राज्याचे अर्थसंकल्पी अधिवेशन सुरू असून, दुसरीकडे राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहे. एकनाथ शिंदेंनी केलेल्या बंडखोरीनंतर पक्षाला पडलेले भगदाड सावरण्यासाठी ठाकरे गटाचे नेते संघर्ष करताना दिसत आहेत. शिवसंवाद, शिवगर्जना अशा यात्रा-मेळाव्यातून पुन्हा एकदा पक्ष बांधणी आणि पक्ष उभारणीचे काम सुरू असलेले दिसत आहे. ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी वरळीत घेतलेल्या मेळाव्यात शिंदे गटासह भाजपवर जोरदार टीका केली.
हे सरकार कोसळणार आहे. हे थोड्या दिवसांचे सरकार असून, यांच्यातच भांडण सुरु आहे. जेव्हा आमदार म्हणून विधानभवनात जातो, तेव्हा यांचाच मित्रपक्ष आमच्याकडे येतात आणि या गद्दारांचे घोटाळे आणून देतात. त्यामुळे या गद्दारांनी समजून घेतले पाहिजे थोड्या दिवसांचा खेळ आहे. खरे तर त्यांनी विआरएस घेतली आहे हे त्यांना कळलेच नसल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले होते. यावर राज्याचे मंत्री आणि शिंदे गटाचे नेते संदीपान भुमरे यांनी प्रत्युत्तर दिले.
एखादा तरी घोटाळा त्यांनी उघड करावा
संदीपान भुमरे प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले की, एखादा तरी घोटाळा त्यांनी उघड करावा. विनाकारण मित्र पक्ष म्हणायचे आणि वेगळ्या दिशेला न्यायचे काम करायचं. मित्र पक्षाने असे केले तसे केले म्हणत, चुकीची माहिती देऊन गैरसमज करण्याचा प्रयत्न केला जात, असे भुमरे यांनी सांगितले.
दरम्यान, तुम्ही आमचे कितीही नाव चोरले, पक्षचिन्ह चोरले तरीही जनतेचे प्रेम आणि आशिर्वाद चोरू शकत नाही. तुमच्या माथी गद्दरांचा शिक्का, तो कधीही पुसला जाणार नाही. माझ्या मनात केवळ सत्यमेव जयते, सत्यामेव जयते नाही. आम्हाला बोलायला लावू नका नाहीतर तुम्हाला फिरणे कठीण होईल, असा इशारा आदित्य ठाकरेंनी दिला होता.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"