मुंबई: गेल्या काही दिवसांपासून स्वातंत्रवीर सावरकरांचा अवमान, गौतम अदानी प्रकरणााची जेपीसी चौकशी, ईव्हीएमचा मुद्दा आणि पंतप्रधान मोदींच्या पदवीचा विषय या मुद्द्यांवरून महाविकास आघाडीमधील ठाकरे गट, राष्ट्रावादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये मतभेद दिसून आले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीमधील ऐक्याला तडे गेले आहेत की काय, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती. याचदरम्यान काल रात्री माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची सिल्व्हर ओक या निवासस्थानी भेट घेतली.
उद्धव ठाकरे यांच्यासोबत खासदार संजय राऊत उपस्थित होते. तर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे यादेखील उपस्थित होत्या. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात विविध मुद्यांवर जवळपास सव्वा तास चर्चा झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाविकास आघाडी म्हणून प्रामाणिकपणे लढूया या मुद्द्यावर बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे. जे संविधानाच्या विरोधात आहेत त्यांच्या विरोधात आपण लढायचं. त्याशिवाय, राज्यात आणि केंद्रात देखील एकी कायम राहिली पाहिजे या मतावरही दोन्ही पक्ष ठाम असल्याची माहिती समोर येत आहे.
उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या भेटीवर शिंदे गटाचे नेते शंभुराज देसाई यांनी निशाणा साधला आहे. सकाळी मातोश्रीवर स्वाभीमानाच्या बाता मारायच्या आणि संध्याकाळी सिल्वर ओकवर जाऊन लोटांगण घालणाऱ्यांनी मातोश्रीचं नाव धुळीला मिळवलं, असं शंभुराज देसाई म्हणाले. तसेच सगळं गुंडाळून काका मला वाचवा म्हणायला तर सिल्व्हर ओकला गेले नाहीत ना? असा सवाल देखील शंभुराज देसाई यांनी उपस्थित केला आहे.
मातोश्रीचा इतिहास आहे, कितीही मोठा नेता असला तरी बाळासाहेबांना भेटायला येत होते. पण आज वेदना झाल्या. आज मराठी बाणा, बाळासाहेब यांचा वारसा सोडून लोटांगण घालत सिल्व्हर ओकला दाखल झाले. महाराष्ट्रातील शिवसैनिकांना वेदना झाल्याचे शंभुराज देसाईंनी यावेळी सांगितले. सावरकर यांच्याबद्दल जे वक्तव्य करण्यात आलं त्यावर भूमिका मांडली नाही. जेपीसीबाबत संजय राऊत भूमिका मांडतात पण याच मुद्द्यावर पवार गरज नसल्याचे सांगतात. त्यामुळं महाविकास आघाडीमध्ये दरी पडण्यास सुरूवात झाल्याचा दावा देखील शंभुराज देसाई यांनी केला आहे.