Join us

आदित्य ठाकरेंच्या आव्हानावर शीतल म्हात्रेंची प्रतिक्रिया; म्हणाल्या पाहुया... किसमे कितना है दम!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2023 10:36 AM

आदित्य ठाकरेंच्या एका विधानावर शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई/ठाणे: ठाण्यात महिलेवर अत्याचार होत असताना मुख्यमंत्री एक शब्द बोलत नाही, याचे आश्चर्य वाटते. त्यामुळे मी इथे घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांवर टीका करण्यासाठी नव्हे, तर त्यांचे कौतुक करण्यासाठी आलो आहे, असं उपरोधिक विधान करत ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. 

मिधेंच्या चिंधीचोरांनी एका महिलेला मारहाण केली. मात्र, तिची तक्रार घेतली नाही. उलट तिच्याविरोधातच गुन्हा दाखल होतो, हा कोणता न्याय आहे, असा सवालही आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला. दोन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे गटाच्या रोशनी शिंदे यांना झालेल्या मारहाणीनंतरही पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्याच्या निषेधार्थ बुधवारी ठाण्यात महाविकास आघाडीतर्फे 'जनप्रक्षोभ मोर्चा' काढण्यात आला. यानंतर शक्तिस्थळावर झालेल्या सभेत ते बोलत होते. 

ठाण्याने शिवसेनेला पहिली सत्ता दिली, ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. याच ठाण्यातील घटनाबाह्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात निवडणूक लढायला मी तयार आहे. मी लढणार आणि जिंकूनही दाखवणार, असे खुले आव्हान ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी दिले. पुन्हा आमचे सरकार आल्यावर विरोधकांना जेलभरो यात्रा घडविण्याचा इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला. आदित्य ठाकरेंच्या या विधानावर शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हिंमत असेल तर आदित्यजी फक्त निवडणुकीला उभे राहाच...नाही ठाणेकरांनी तुमचं डिपॉजिट जप्त केलं तर पाहाच...पाहूया... किसमे कितना है दम..., असं शीतल म्हात्रेंनी आव्हान दिलं आहे. 

चोरांच्या टोळीचे कृत्य

तक्रार करण्यासाठी गेलो असता, पोलिस आयुक्तही पळून जातात; पण याबद्दल कोणाला काय बोलणार? ज्यांच्या पक्षाचे सरकार आहे, त्यांनी पक्ष चोरलेला आहे, त्यामुळे चोरांची टोळी हे कृत्य करू शकते, असेही ते म्हणाले.

आमचे सरकार येणार, विसरू नका

सध्या तुम्हाला आमच्यावर किती गुन्हे दाखल करायचे ते करा. मात्र, पुन्हा आमचे सरकार येणार आहे, हे ठाकरे आहे. जेव्हा आमचे सरकार येईल तेव्हा तुम्हा सर्वांना जेलभरो यात्रा घडविली नाही तर बघा, असा इशारा आदित्य यांनी दिला. आम्ही आता भविआ'ची वज्रमूठ केली आहे. ठाणेकरांनी आम्हाला साथ द्यावी, असे आवाहन केले.

टॅग्स :आदित्य ठाकरेशिवसेनानिवडणूकठाणे