मुंबई: ठाण्यातील ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्या रोशनी शिंदे यांना शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांकडून झालेल्या मारहाण प्रकरणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कठोर शब्दात टीका केली. राज्यात गुंडगिरीचे राज्य आहे. यांना मुख्यमंत्री म्हणायचे की गुंडमंत्री म्हणायचे हे लोक ठरवतील. त्यांनी गुंडमंत्री असे पद निर्माण करून गुंड पोसण्याचे काम त्या मंत्र्याकडे द्यावे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
ठाण्यात आता महिला गुंडांचीही गँग तयार होऊ लागली आहे. आम्ही आमच्यावरील संस्कारामुळे शांत आहोत, पण जर ठरविले तर एका क्षणात ठाणेच काय तर महाराष्ट्रातील गुंडगिरी उपटून काढू शकतो, असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिला. यापूर्वी भाजपच्या ठाण्यातील पदाधिकाऱ्याला शिंदे गटाच्या नेत्यांनी मारहाण केली तेव्हाही ठोस कारवाई झाली नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री पदासाठी लाळघोटेपणा करत आहेत. महिलांचा सन्मान केवळ बोलून होत नाही. ज्यांच्या नावाने (स्वा.सावरकर) तुम्ही यात्रा काढताय, त्यांच्यासारखे वर्तन करा, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी यावेळी लगावला.
मी हिंदुत्व सोडले याचे एक उदाहरण दाखवा, मी घरी बसेन, असं आव्हान देखील उद्धव ठाकरेंनी यावेळी दिले. उद्धव ठाकरेंच्या या विधानावर शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी ट्विट करत ४ उदाहरण दिली आहेत. छत्रपती संभाजीनगर नामांतरास विरोध...मुंबई बॉम्बस्फोट आरोपींना मदत करणार्या नवाब मलिक यांच्यासंदर्भात घेतलेली बोटचेपी भूमिका...भोंग्यांसंदर्भात घेतलेली मवाळ भूमिका...सावरकरांचा अपमान केला त्याच्या पक्षासोबत अजून ही आहात, असं शीतल म्हात्रे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान, काय होतास तू, काय झालास तू, असा कसा वाया गेलास तू? उद्धव ठाकरे मला फडतूस गृहमंत्री म्हणतात, मात्र मी फडतूस नाही काडतूस आहे. झुकेगा नही तो घुसेगा, या शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. राज्याचा गृहमंत्री असल्याने अनेक लोकांना अडचण होत असून, ते देव पाण्यात ठेवून बसले आहेत. मी कुठल्याही स्थितीत हे पद सोडणार नाही. चुकीचे काम करेल, त्याला तुरुंगात टाकल्याशिवाय राहणार नाही. कुठल्याही घटनेची निष्पक्ष चौकशी सरकार करेल. पंतप्रधान मोदी यांचे फोटो लावून ते निवडून आले व त्यानंतर खुर्चीसाठी लाळघोटेपणा केला. खरा फडतूस कोण हे सर्वांनाच माहिती आहे. मी नागपूरचा आहे. ते ज्या भाषेत बोलले त्याहून खालची भाषा मला येते. पण, माझी तसे बोलण्याची पद्धत नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.