Join us

दगडाला पाझर फुटला नाही, म्हणूनच ५० आमदार फुटले; केसरकरांचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2022 11:46 AM

शिंदे गटातील मंत्री दीपक केसरकर यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

सततच्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. याचपार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद दौरा करुन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली होती. तसेच यावेळी शिंदे-फडणवीस सरकारवर देखील निशाणा साधला होता. 

आमच्या काळात एनडीआरएफचे निकष बदलले होते. त्यावेळी मी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घरी बसून संवाद साधला होता. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार गंभीर नसेल, तर आम्ही त्यांना भाग पाडू. आमच्याशी सत्तेसाठी गद्दारी केली पण बळीराजाशी गद्दारी करु नका. सरकारला पाझर फुटत नसेल, तर घाम फोडू. प्रसंगी मी स्वत: रस्त्यावर उतरणार असल्याचा इशाराही उद्धव ठाकरेंनी यावेळी दिला आहे. 

उद्धव ठाकरेंच्या या विधानावर आता शिंदे गटातील मंत्री दीपक केसरकर यांनी देखील प्रत्युत्तर दिलं आहे. दगडाला पाझर फुटला नाही, म्हणूनच ५० आमदार फुटले. उद्धव ठाकरेंना तेव्हा पाझर फुटला असता, शिवसैनिकांना साध्या भेटी दिल्या असत्या, तसेच जनतेची गाऱ्हाणी समजून घेतली असती तर पक्षामध्ये बंड का झालं असतं का?, असा सवाल दीपक केसरकरांनी उपस्थित केला आहे. 

एकनाथ शिंदे गटाचे ५० आमदार भाजपाच्या संपर्कात; मंत्र्यांनं स्पष्टच सांगितले

आम्ही कुणावर टीका करत नाही. फक्त लोकांना भडकवून सरकार चालवता येत नाही. त्यासाठी कामं करावी लागतात. आमची दुःख आमच्या हृदयात आहेत. ती सांगून आम्हाला मतं मिळवायची नाहीत. आमच्या कामावर आम्हाला मतं मिळवायची आहेत. ते आम्ही करून दाखवू, असंही दीपक केसरकर म्हणाले. तसेच शिंदे गटातील २२ आमदार भाजपात प्रवेश करणार असल्याची सध्या चर्चा सुरु आहे. यावर देखील दीपक केसरकर यांनी भाष्य केलं आहे. शिंदे गटाचे २२ नव्हे तर ५० आमदार हे भाजपाच्या संपर्कात आहेत. भाजपासोबत आमची मैत्री घट्ट आहे. त्यामुळे ठाकरे गटाला त्याची चिंता करण्याची आवश्यकता नाही अशा शब्दात खोचक टीका त्यांनी केली आहे. 

दरम्यान, महाराष्ट्राच्या ग्रामपंचायत, सरपंच निवडणुकीत यश मिळाल्याचा शिंदे गटाचा दावा खोटा आहे. शिंदे गटाचे किमान २२ आमदार नाराज आहेत. यातील बहुसंख्य आमदार स्वत:ला भाजपात विलीन करून घेतील हे स्पष्ट दिसते. त्यानंतर शिंदेंचे काय होणार? एकनाथ शिंदे यांनी स्वत:बरोबर महाराष्ट्राचे मोठे नुकसान केले. त्यामुळे महाराष्ट्र एकनाथ शिंदे यांना माफ करणार नाही अशी टीका सामना मुखपत्रातून उद्धव ठाकरेंनी केली. त्याचसोबत एकनाथ शिंदे यांना तोफेच्या तोंडी देऊन भाजपा स्वत:चे राजकारण करत राहील. भाजपाचे नेते सरळ सांगतात, शिंदे यांनाही उद्या भाजपातच विलीन व्हावे लागेल व त्यावेळी ते नारायण राणे यांच्या भूमिकेत दिसतील, अशी टीका ठाकरे गटाने केली होती.

 सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वलमराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :उद्धव ठाकरेदीपक केसरकर शिवसेना