Join us

'खेकड्यांनी चमत्कार करुन दाखवला, ते आता वाघ्याच्या भुमिकेत'; शिंदे गटाचं ठाकरेंना प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2023 1:33 PM

उद्धव ठाकरेंच्या या टीकेला शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

मुंबई: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची खासदार संजय राऊत यांनी एक मुलाखत घेतली. या मुलाखतीत उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर जोरदार टीका केली. मुलाखतीदरम्यान तुमच्या नेतृत्वाखालील सरकार वाहून गेले, असा सवाल संजय राऊतांनी विचारला त्यावर सरकार वाहून गेले नाही. तर खेकड्यांनी ते पोखरले, असे उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिले. 

उद्धव ठाकरेंच्या या टीकेला शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. उद्धव ठाकरे यांची जी मुलाखत प्रसिद्ध झाली आहे त्यात मनातली मळमळ, जळजळ होती ती सगळी तोंडातुन बाहेर पडताना दिसत आहे. पद गेल्याचं खुप मोठं दु:ख उद्धव ठाकरे यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे. रोज एक एक सहकारी सोडुन जात आहे. उद्धव ठाकरे जरी खेकडे म्हणतं असले तरी या खेकड्यांनी चमत्कार करुन दाखवला आहे. खेकडे हे आता वाघाच्या भुमिकेत आले आहेत, असं प्रत्युत्तर संजय गायकवाड यांनी दिले आहे.

उद्धव ठाकरेंच्या या टीकेला आता गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आम्हाला खेकडा म्हणता तर म्हणा. पण लक्षात ठेवा खेकडाच कावीळवर योग्य पर्याय ठरतो. या खेकड्यांना जपले असते तर शिवसेना फुटली नसती, असा घणाघात गुलाबराव पाटील यांनी केला. बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे जाताय ही चांगली बाब आहे. आम्हाला एक कळत नाही आमचा दोष काय होता? आता कोण कुठे जाऊन मुजरा करतो हे पाहावे लागेल. तुम्ही दिल्लीत जाऊन राम राम करायचा तेव्हा काय?, असे प्रतिप्रश्न गुलाबराव पाटील यांनी केले,

दरम्यान, राज्यात ईर्शाळवाडीची दुर्घटना घडली असताना मुख्यमंत्री दिल्लीत जातात, तिकडे मणीपूरमधील महिलेची विवस्त्र धिंड काढण्यात येते, या घटनेवरुन देशभरात तीव्र संताप व्यक्त केला जातो. मे महिन्यात घडलेली ही घटना आत्ता व्हिडिओच्या माध्यमातून समोर आली. तशीच आणखी एक घटना तिकडे घडली. पण, तरीही पंतप्रधान तिकडे जायला तयार नाहीत. सर्वोच्च न्यायालयाने ताकीद दिल्यानंतर फक्त ३० ते ३५ सेकंदाचं ते काहीतरी बोलले आणि राजस्थानला प्रचारासाठी निघून गेले, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. 

लोकशाही साधा माणूस वाचवणार

हा देश प्रत्येकाचा आहे. त्यानेच आता धैर्याने उभं राहायला हवं. हे सरकार कुणाचे आहे तर हे सरकार माझे आहे. त्या सामान्य माणसाचे आहे. त्या सामान्य माणसाच्या मतांवर हे सरकार निवडून आले आहे. त्या सामान्य माणसाने आता विचार करून मत दिले पाहिजे. कारण तो नुसते मत देत नाही तर तो त्याचं आयुष्य यांच्या हातात देतोय. नुसतं आयुष्य नाही तर पुढच्या पिढीचं भविष्य यांच्या हातात देतोय. कारण यांना सत्तेत दहा वर्ष झाली म्हणजे एक पिढी पुढे सरकली. या पुढच्या पिढीसाठी जनतेने आताच शहाणे व्हायला पाहिजे असं आवाहन उद्धव ठाकरेंनी जनतेला केले.

टॅग्स :उद्धव ठाकरेशिवसेनासंजय गायकवाड