Join us

राज ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख होणार? शिंदे गटातील खासदारचे सूचक विधान, म्हणाले, “मनसे...”

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2024 2:54 PM

Shiv Sena Shinde Group MP Rahul Shewale News: एकनाथ शिंदेंकडे शिवसेना पक्ष आणि चिन्ह आहे. पण ठाकरे हे नाव नाही. त्यामुळे राज ठाकरेंकडे शिवसेना शिंदे गटाची धुरा सोपवली जाऊ शकते, अशी चर्चा आहे.

Shiv Sena Shinde Group MP Rahul Shewale News: महाविकास आघाडीचे जागावाटप अद्याप निश्चित होत नसताना महायुतीतील घडामोडींना वेग आला. जागावाटपाबाबत महायुतीची बैठक सुरू असतानाच महादेव जानकर यांनी महायुतीला पाठिंबा जाहीर केला. तर काँग्रेसचे आमदार राजू पारवे यांनी शिंदे गटात प्रवेश केला. तसेच राज ठाकरे यांच्या महायुतीतील सहभागाबाबत वाटाघाटी सुरू आहेत. यातच शिवसेना शिंदे गटाची धुरा आता राज ठाकरे यांच्याकडे जाऊ शकते, अशी शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. 

शिवसेना शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी याबाबत सूचक शब्दांत प्रतिक्रिया दिली. मनसे महायुतीत सहभागी होत असेल, तर आम्ही त्यांचे स्वागत करू. कारण शिवसेना शिंदे गट आणि मनसे यांचे विचार तसेच कार्यप्रणाली सारखीच आहे. दोन्ही पक्षांचे ध्येय सारखेच आहे. त्यामुळे नक्कीच महायुतीची ताकद वाढेल. ज्या गोष्टीचा आपण उल्लेख केला, तशी कोणतीही गोष्ट नाही. आता फक्त लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील घटक पक्षांच्या चर्चा सुरू आहेत आणि ही निवडणूक कशी जिंकू, यासंदर्भातील प्लॅनिंग सुरू आहे. 

राज ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख होणार?

राज ठाकरे हे ठाकरे आहेत. एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्ह आहे. मात्र, कुठेतरी ठाकरे हे नाव नसल्यामुळे राज ठाकरेंकडे ही जबाबदारी जाऊ शकते. शिवसेनेतील सर्व आमदार नेत्यांना तशा पद्धतीने अजून स्वीकारले जात नसल्याचे चित्र आहे आणि राज ठाकरे यांच्याकडे ठाकरे नाव असल्यामुळे त्यांच्या नावाची चर्चा आहे, असा प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना, सध्यातरी माझ्यापर्यंत असा विषय आला नाही. लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात भाजपाचे वरिष्ठ नेते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार चर्चा करत आहेत. मनसेला महायुतीत सहभागी करून घेण्यासाठी सर्वचजण उत्सुक आहेत. समविचारी पक्ष असल्यामुळे मनसे सोबत आली पाहिजे, अशी आमचीही भावना आहे, असे राहुल शेवाळे यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, शिवसेना शिंदे गटाची उमेदवारांची यादी अद्याप आलेली नाही. शिवसेना शिंदे गट बॅकफूटवर का दिसत आहे, असे विचारले असता, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करत आहेत. या चर्चा अंतिम टप्प्यात आहेत. उद्या किंवा परवा शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांची घोषणा केली जाऊ शकेल, असे राहुल शेवाळे यांनी सांगितले. 

टॅग्स :लोकसभा निवडणूक २०२४महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४शिवसेनामनसेराज ठाकरेएकनाथ शिंदेराहुल शेवाळे