शिंदे गटाची दसरा मेळाव्यासाठी बीकेसीवर तयारी; सर्वोच्च न्यायालयात जाणार नसल्याचे संकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2022 06:06 PM2022-09-24T18:06:55+5:302022-09-24T18:07:04+5:30
ठाकरे गटाला परवानगी दिल्यानंतर शिंदे गट सर्वोच्च न्यायालयात जाणार, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती.
मुंबई- दसरा मेळाव्यासाठी शिवाजीपार्क मैदान देण्याच्या याचिकेवर उच्च न्यायालयात शुक्रवारी सुनावणी झाली. यामध्ये ठाकरे गट, शिंदे गट आणि पालिकेच्या वतीने युक्तीवाद करण्यात आला. शिंदे गट आणि ठाकरे गटाने उच्च न्यायालयात आम्हीच खरी शिवसेना आहोत, असा युक्तीवाद केला.
न्यायालयाने तुमचा युक्तीवाद मर्यादेत ठेवा, निर्णयही द्यायचा आहे, असे तिन्ही बाजुंना सांगितले. या युक्तीवादानंतर न्यायालयाने शिवाजीपार्कवर दसरा मेळावा होणार? कोणत्या गटाचा होणार, यावर निर्णय दिला आणि शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटाला परवानगी दिली.
दसरा मेळाव्याला गर्दी जमवण्याची रणनीती; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कामाला लागले
ठाकरे गटाला परवानगी दिल्यानंतर शिंदे गट सर्वोच्च न्यायालयात जाणार, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. तसेच शिंदे गटातील काही नेत्यांनी देखील आम्ही सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचं सांगण्यात येत होतं. मात्र आता शिंदे गट सर्वोच्च न्यायालयात जाणार नसल्याचे संकेत दिसत आहेत. कारण शिंदे गटाने बीकीसी मैदानावर दसरा मेळावा घेण्याची तयारी सुरु केली आहे. आजपासून मैदानाची स्वच्छता करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे शिंदे गट सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता कमी आहे.
दसरा मेळावा गेली अनेक वर्षे होतोय-
न्यायालयाने शिवाजीपार्कवर दसरा मेळावा गेली अनेक वर्षे होतोय. सरकारने ४५ दिवस अशा कार्यक्रमांसाठी राखीव ठेवलेले आहेत, अशी टिप्पणी केली. तसेच सर्वोच्च न्यायालयातील याचिकांवर या निकालाचा परिणाम होणार नाही. ही याचिका फक्त शिवाजी पार्कची जागा दसरा मेळाव्यासाठी दिली जावी यावर आहे, असेही न्यायालयाने सुरुवातीलाच स्पष्ट केले होते. पालिकेचा निर्णय हा वास्तविकतेला धरून नाही, पालिकेला परिस्थीती माहिती होती, असे मत न्यायालयाने नोंदविले. तसेच दादर पोलिसांचा अहवाल मान्य होण्यासारखा आहे, असेही न्यायालय म्हणाले.