Join us

Maharashtra Political Crisis: “राज ठाकरेंच्या पाठिशीही शरद पवारांचे आशीर्वाद होते, मनसे प्रमुख त्यांना मानतात” 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2022 1:20 PM

Maharashtra Political Crisis: शिवसेना जेव्हा जेव्हा फुटली, तेव्हा घडलेल्या गोष्टींचा साक्षीदार आहे, असे दीपक केसरकर यांनी म्हटले आहे.

मुंबई: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ३८ हून अधिक आमदारांनी केलेल्या बंडखोरीमुळे शिवसेनेला मोठे भगदाड पडल्याचे पाहायला मिळत आहे. एकीकडे पक्षातील डॅमेज कंट्रोल करण्यासाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) अधिक सक्रीय झाले आहेत. उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवना पदाधिकारी, नेत्यांच्या बैठका घेण्यास सुरुवात केली आहे, तर आदित्य ठाकरे निष्ठा यात्रेच्या माध्यमातून पक्षाची मोट बांधण्याचा प्रयत्न करत आहेत. दुसरीकडे, शिंदे गटाकडून सातत्याने आपली भूमिका स्पष्ट केली जात आहे. 

शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी शिवसेना फुटण्याला शरद पवार यांना जबाबदार धरले आहे. यापूर्वी, छगन भुजबळ, नारायण राणे शिवसेनेतून बाहेर पडले. पण, त्यामागे शरद पवार यांचाच हात होता. मी त्याचा साक्षीदार आहे, असा मोठा गौप्यस्फोट दीपक केसरकर यांनी केला. मी राष्ट्रवादीत होतो, त्यावेळी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्रात जेव्हा जेव्हा शिवसेना फुटली तेव्हा त्यामागे शरद पवार होते ही वस्तुस्थिती आहे. त्यांनी शिवसेना का फोडली? बाळासाहेब जिवंत होते तेव्हा त्यांना यातना का दिल्या? याचे उत्तरही महाराष्ट्राच्या जनतेला दिले पाहिजे, असे केसरकर म्हणाले. 

राज ठाकरेंच्या पाठिशीही शरद पवारांचे आशीर्वाद होते

शरद पवारांनीच मला, जरी मी नारायण राणेंना बाहेर पडण्यासाठी मदत केली असली तरी कोणत्या पक्षात जावे याची अट ठेवलेली नाही असे सांगितले होते. हा निश्चितच त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. पण याचा अर्थ नारायण राणे यांना शिवसेनेतून बाहेर पडण्यासाठी शरद पवारांनीच मदत केली होती. छगन भुजबळांना तर ते स्वत: बाहेर घेऊन गेले होते. राज ठाकरेंच्या पाठीशीही त्यांचे आशीर्वाद होते. राज ठाकरे त्यांना मानतात, असे दीपक केसरकर यांनी सांगितले. तत्पूर्वी एका कार्यक्रमात बोलताना, राज ठाकरे यांनी शरद पवार अनेकांना अनेक सल्ले देतात. त्यांनी मलाही एक सल्ला दिला होता, मी तो ऐकला, असा एक सूचक किस्सा सांगितला होता. 

दरम्यान, मला महाराष्ट्रभरातून असंख्य फोन येतात. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले याचा आनंद आहे, पण त्यांच्यासोबत उद्धव ठाकरेंचे आशीर्वादही हवेत असे सांगतात. हे आशीर्वाद मिळतील तेव्हा प्रत्येक शिवसैनिक आम्ही हिंदुत्ववादी आहोत असे सांगेल, असे दीपक केसरकर यांनी म्हटले.  

टॅग्स :महाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळदीपक केसरकर राज ठाकरेशरद पवार