“संजय राऊत-आदित्य ठाकरेंविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणणार, प्रक्रिया सुरु”; शिंदे गट आक्रमक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2024 02:31 PM2024-01-11T14:31:38+5:302024-01-11T14:32:36+5:30
Mla Disqualification Case Verdict: आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल विधानसभा अध्यक्षांनी कायद्याच्या चौकटीत राहून दिला, असे शिंदे गटाच्या नेत्यांनी म्हटले आहे.
Mla Disqualification Case Verdict: बहुमताच्या आधारावर शिवसेना ही एकनाथ शिंदे यांचीच आहे. दोन्ही गटांच्या व्हिपमध्ये कारवाईबाबत कोणतीही ठोस नोंद नसल्याने दोन्ही गटांच्या आमदारांना अपात्र ठरविता येत नसल्याचा महत्त्वपूर्ण निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला. आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकालानंतर ठाकरे गट आक्रमक झाला. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सडकून टीका केली. आदित्य ठाकरे यांनीही प्रतिक्रिया देताना हल्लाबोल केला. शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी प्रत्युत्तर दिले. यातच आता संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव आणणार असून, याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती शिंदे गटातील नेत्यांनी दिली.
आमदार अपात्रता प्रकरणी आलेल्या निकालानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी असंसदीय भाषेत वक्तव्य केले. त्यांच्या विरोधात हक्कभंग आणण्यासाठी आमची प्रक्रिया सुरू झाली आहे, अशी माहिती शिवसेना शिंदे गटाचे उत्पादन शुल्कमंत्री मंत्री शंभुराज देसाई यांनी दिली. आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल विधानसभा अध्यक्षांनी कायद्याच्या चौकटीत राहून दिला, असे शंभुराज देसाई यांनी सांगितले.
तिथे राऊतांनी लोकशाहीला तिलांजली वाहिली नाही का?
आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल हा लोकशाहीच्या इतिहासातला हा काळा दिवस आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली होती. यावर बोलताना, निवडणुकीत ज्याच्यासोबत मते मागितली त्यांच्याच विरोधात सरकार बनवले ही लोकशाही आहे का, तिथे राऊतांनी लोकशाहीला तिलांजली वाहिली नाही का, अशी विचारणा शंभुराज देसाईंनी केली.
दरम्यान, आमदार अपात्रता प्रकरणचा निकाल संपूर्ण न्यायालयीन प्रक्रिया पार पाडून देण्यात आलेला आहे. आमदारांच्या अपात्रतेची मागणी कशी चुकीची हे अध्यक्षांनी सांगितले. आम्ही शिवसेना सोडलेली नाही, दुसऱ्या गटात गेलो नाही. नैसर्गिक युतीत निवडून आलो असताना उद्धव ठाकरेंच्या भूमिकेमुळे ज्यांच्या विरोधात निवडणूक लढवली त्यांच्यासोबत इच्छेविरोधात सरकारमध्ये सहभागी झालो. सरकार स्थापन करताना दोन- तीन हॉटेलमध्ये आम्हाला ठेवले. त्यावेळी पक्ष प्रमुखांकडे भाजप शिवसेनेचे सरकार असले पाहिजे हे वारंवार म्हणत होतो. जर मॅचफिक्सिंग असती तर १४ आमदारही अपात्र ठरवले गेले असते. ठाकरे गटाने न्यायालयात जावे. आम्ही न्यायालयात आमची बाजू मांडू, असे शंभुराज देसाईंनी स्पष्ट शब्दांत सांगितले.