युवासेनेचे प्रमुख कालपर्यंत कुठेही दिसत नव्हते; आज मुंबईत दिसताय, दीपक केसरकरांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2022 03:35 PM2022-07-25T15:35:44+5:302022-07-25T15:39:03+5:30
शिंदे गटातील प्रवक्ते दीपक केसरकर यांनी शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे.
मुंबई- शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी आता शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून बंडखोर आमदारांच्या मतदार संघात जाऊन शिवसैनिकांशी संवाद साधण्यास सुरुवात केली आहे. राज्यभरात जाऊन आदित्य ठाकरे पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधत बंडखोर आमदार आणि खासदारांवर निशाणा साधत आहे.
राज्यात सर्कस सुरु झालं आहे. गद्दार हा गद्दारच असतो. मूळ शिवसैनिक इथेच आहे. ज्यांनी गद्दारी केली ते निघून गेले, अशी टीका आदित्य ठाकरेंकडून करण्यात येत आहे. मात्र आदित्य ठाकरेंच्या या विधानावर आणि संवाद यात्रेवर शिंदे गटातील प्रवक्ते दीपक केसरकर यांनी टीका केली आहे. त्यांनी आज पत्रकार परिषद घेत विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.
केंद्र आणि राज्याचे चांगले संबंध राहिले पाहिजे. मात्र शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या विधानामुळे केंद्रासोबतचे संबंध खराब झाले, अशी टीका दीपक केसरकर यांनी केली. आज तुम्ही मुंबईत दिसू लागले. युवासेनेचे प्रमुख कालपर्यंत कुठेही दिसत नव्हते. मात्र आता शाखेत फिरु लागलेत, असा टोला दीपक केसरकर यांनी आदित्य ठाकरेंना लगावला. तसेच मी त्यांचा आदर करतो, हेही सांगालयला दीपक केसरकर विसरले नाही.
दीपक केसरकर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर देखील निशाणा साधला. उद्धव ठाकरे जनतेला कितीवेळा भेटले?, मंत्रालयात कितीवेळा गेले?, असा सवालही दीपक केसरकरांनी विचारला. तसेच आमच्या एकही प्रश्नांची उत्तर त्यांनी दिलं नाही. आघाडी तोडा हे आम्ही सांगत होतो, मग कटकारस्थान केलं हे का बोलताय, असंही दीपक केसरकर यावेळी म्हणाले.