संजय राठोडांना मंत्रिपद मिळण्यासाठीही महंत सुनिल महाराज पुढे आले होते; शिंदे गटाचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2022 05:40 PM2022-09-30T17:40:40+5:302022-09-30T17:41:03+5:30

शिंदे गटाचे प्रवक्ते किरण पावसकर यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.

Shinde group spokesperson Kiran Pavaskar has taunt to former Chief Minister Uddhav Thackeray. | संजय राठोडांना मंत्रिपद मिळण्यासाठीही महंत सुनिल महाराज पुढे आले होते; शिंदे गटाचा टोला

संजय राठोडांना मंत्रिपद मिळण्यासाठीही महंत सुनिल महाराज पुढे आले होते; शिंदे गटाचा टोला

Next

मुंबई- पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणापासून चर्चेत असलेले तत्कालीन शिवसेना नेते आणि सध्याचे शिंदे गटाचे मंत्री संजय राठोड यांना मोठा धक्का बसणार आहे. बंजारा समाजाचा चेहरा म्हणून राठोडांकडे पाहिले जात होते. परंतु आता राठोडांनाच टक्कर देण्यासाठी बंजारा समाजाचे महंत सुनिल महाराज यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्रीवर जाऊन शिवबंधन बांधले. 

गेल्या अनेक दिवसांपासून याबाबत चर्चा सुरू होती. अखेर महंतांनी आज मुंबईत जाऊन शिवसेनेत प्रवेश केला. आज पंचमीची यात्रा असून पोहोरादेवीच्या यात्रेचा मुहूर्त साधून मी शिवसेनेत प्रवेश करत आहे. संपूर्ण राज्यात १.५ ते २ कोटी बंजारा समाजबांधवांना न्याय देण्यासाठी आम्ही खंबीरपणे उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहणार आहोत. कारण, शिवसेनाच बंजारा समाजाला न्याय देऊ शकते, सत्तेत वाटा देऊ शकते, असे सुनिल महाराज यांनी यावेळी बोलताना म्हटले. 

साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा... असे आपण म्हणतो. नवरात्रीच्या मुहूर्तावर बंजारा समाजातील महंतांनी शिवसेनेत प्रवेश केला, मी त्यांचं स्वागत करतो. बंजारा समाजातील कडवट शिवसैनिक आजही आमच्यासोबत आहेत, अशी टीका उद्धव ठाकरेंनी यावेळी केली. उद्धव ठाकरेंच्या या विधानावर आता शिंदे गटानेही टोला लगावला आहे. संजय राठोड यांना मंत्रिपद मिळण्यासाठी देखील महंत सुनील महाराज पुढे आले होते. महंत सुनील महाराज यांना उद्धव ठाकरेंचे विचार पटले असतील तर, आनंदाची गोष्ट आहे, असं शिंदे गटाचे प्रवक्ते किरण पावसकर यांनी म्हटलं आहे. 

महंत सुनील महाराज हे शिवबंधन बांधणार असल्याचं त्यांनी स्वत:च स्पष्टीकरण दिलं होतं. आपण बंजारा समाजाचे प्रश्न घेऊन, समाजहिताचे प्रश्न, पोहरादेवी तीर्थक्षेत्र विकासाचे प्रश्न घेऊन मुंबईत गेलो असता बंजारा समाजाचे नेते मंत्री संजय राठोड यांना भेटण्यासाठी कार्यालयात गेलो तिथे मिळालेली वागणूक हीन सांगण्यासारखी आहे. मला त्या कार्यालयात ४ तास थांबवून ठेवले. त्यानंतर भेट झाल्यानंतर मंत्र्यांनी १० मिनिटेही वेळ दिला नाही. त्यांच्या देहबोली आणि वृत्तीवरून माझी उपस्थिती त्यांना खटकत असल्याचं दिसून आले असं सुनिल महाराज यांनी यापूर्वी सांगितलं होतं. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: Shinde group spokesperson Kiran Pavaskar has taunt to former Chief Minister Uddhav Thackeray.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.