'हिंदुत्ववादी विचार सोडणाऱ्यांचा दसरा मेळाव्यावर कुठला हक्क?'; शिंदे गटाचा सवाल, राजकारण तापणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2022 01:38 PM2022-08-29T13:38:50+5:302022-08-29T13:49:46+5:30

दसरा मेळावा घेण्याचा अधिकार आमचा आहे, असं शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी सांगितले.

Shinde group spokesperson Naresh Mhaske said that we have the right to hold Dussehra Mela | 'हिंदुत्ववादी विचार सोडणाऱ्यांचा दसरा मेळाव्यावर कुठला हक्क?'; शिंदे गटाचा सवाल, राजकारण तापणार

'हिंदुत्ववादी विचार सोडणाऱ्यांचा दसरा मेळाव्यावर कुठला हक्क?'; शिंदे गटाचा सवाल, राजकारण तापणार

Next

मुंबई/ठाणे- गेल्या अनेक दिवसांपासून शिवाजी पार्कवर होणाऱ्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरून अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बंडखोरी केल्यानंतर मोठे भगदाड शिवसेनेला पडले आहे. मात्र, आम्हीच शिवसेना असल्याचा दावा शिंदे गटाकडून केला जात आहे. यातच शिवाजी पार्कवर होणारा शिवसेनेचा दसरा मेळावा शिंदे गट हायजॅक करण्याच्या प्रयत्नात असल्याच्या चर्चा सुरू आहे. 

शिवसेना आणि दसरा मेळावा असे एक अतूट नाते असून, या निमित्ताने दादरच्या शिवाजी पार्क मैदानात होणाऱ्या शिवसेनेच्या सभेला राज्यातील कानाकोपऱ्यातून शिवसैनिक उपस्थिती लावतात. मात्र, यंदा शिवाजी पार्क मैदानात नेमका कोणी मेळावा घ्यायचा, यावरून उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. याचदरम्यान शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी दसरा मेळाव्याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. 

हिंदुत्ववादी विचारसरणीचा दसरा मेळावा व्हायचा. आता ज्यांनी हिंदुत्ववादी विचार सोडला, त्यांचा दसरा मेळाव्यावर हक्क कुठला?आम्ही हिंदुत्ववादी विचारांचे आहोत. त्यामुळे दसरा मेळावा घेण्याचा अधिकार आमचा आहे…या संदर्भात मुख्यमंत्री लवकरच निर्णय घेतील, असं नरेश म्हस्के यांनी म्हटलं आहे. 

दरम्यान, शिवसेनेच्या प्रत्येक गोष्टींवर दावे ठोकण्याचा सपाटा दोन्ही बाजूंकडून सुरू आहे. अशावेळी यंदाच्या दसरा मेळाव्याला अधिकच महत्त्व आहे. यावेळी शिवसेनेने खबरदारीचा उपाय म्हणून मेळाव्याच्या परवानगीसाठी अर्ज केला आहे. मात्र त्यांना परवानगी देण्यासाठी खुद्द महापालिकेनेच आखडता हात घेतल्याचे समजते. उद्धव ठाकरे यांनी महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांच्याशी याबाबत संवाद साधल्याचे समजते. मात्र, अद्याप त्यांना परवानगी मिळाली नसल्याचे सांगितले जात आहे. 

उद्धव बाळासाहेब ठाकरेंचाच दसरा मेळावा होणार- किशोरी पेडणेकर

प्रत्येक वर्षी गणेशोत्सव झाल्यानंतर शिवाजी पार्कवर होणाऱ्या दसरा मेळाव्याच्या अर्जाबाबत आयुक्त निर्णय देत असतात. तुम्ही हवे तर दरवर्षीचे रेकॉर्ड तपासा. त्यामुळे आयुक्तांनी याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. गणेशोत्सवानंतरच यावर निर्णय होईल. कोणी काही म्हणत असले, तरी उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच शिवाजी पार्कवर शिवसेनेचा दसरा मेळावा घेणार, असे शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी अगदी स्पष्टपणे सांगितले.

मला कोणतीही कल्पना नाही- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शिवसेनेच्या दसरा मेळाव्याबाबत मला कोणतीही कल्पना नाही. मात्र, गृहमंत्री म्हणून जे नियमात असेल ते करु असे वक्तव्य फडणवीसांनी केलं आहे. देवेंद्र फडणवीस हे आज नागपूरच्या दौऱ्यावर आहेत. नागपूर विमानतळावर त्याचे आगमन झाल्यावर प्रसारमाध्यमांशी त्यांनी संवाद साधला. 

Web Title: Shinde group spokesperson Naresh Mhaske said that we have the right to hold Dussehra Mela

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.