मुंबई - दसरा मेळावा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी सुरू केला त्याची टॅगलाईन होती हिंदुत्ववादी विचारांचे सोनं लुटण्यासाठी या, आता ज्यांना परवानगी मिळाली त्याठिकाणी हिंदुत्ववादी विचार ऐकायला मिळणार नाहीत. तर टोमणे ऐकायला मिळतील. गद्दार, वज्रमूळ, खोके, बेईमानी हेच शब्द असतील. ही टोमणे सभा असेल आणि खरा हिंदुत्ववादी विचार ऐकायचा असेल तर जिथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांची सभा होईल तिथे हिंदुत्ववादी विचार ऐकायला मिळतील असं सांगत शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.
प्रवक्ते नरेश म्हस्के म्हणाले की, छगन भुजबळांनी जेव्हा शिवसेना सोडली तेव्हा कुठल्या भाषेत टीका केली होती. टी बाळू असा वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख केला. कैदी म्हणून बाळासाहेबांना जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला. त्यांना शिवसेनेची बाजू घेण्याचा काय अधिकार आहे. छगन भुजबळांना स्मृतीभंश झाला आहे. बाळासाहेबांना त्रास देणारा माणूस हा छगन भुजबळ आहे. जे शिवसैनिक फटाके फोडतायेत त्यांचं भुजबळांबाबत काय मत आहे हे विचारा असं त्यांनी सांगितले.
तसेच आमची सभा मुंबईतच होणार, राज्यभरात सभा होतायेत. प्रचंड गर्दी सभांना होतेय. राज्यातील बहुतांश पदाधिकारी एकनाथ शिंदेंसोबत आहेत. एकनाथ शिंदेंच्या सभेत हिंदुत्ववादी विचार ऐकायला मिळतील. उद्धव ठाकरेंच्या सभेत टोमणे ऐकायला मिळतील. मोठ्या उत्साहात, जल्लोषात मुंबईतच सभा होणार आहे. शिंदे विरुद्ध ठाकरे असा वाद नाही. हा वाद बाळासाहेबांचे विचार, तत्व आणि खुर्चीसाठी ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले त्यांच्यासोबतचा हा वाद आहे असंही शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी म्हटलं.
वाजत गाजत या, पण परंपरेला गालबोट लागेल असे वागू नका
कार्यकर्त्यांनी वाजत गाजत यावे परंतु दसरा मेळाव्याला गालबोट लागेल असे वागू नये, असे आवाहन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना केलं आहे. हायकोर्टाच्या निर्णयानंतर त्यांनी माध्यमांसमोर आपली भूमिका मांडली. उद्धव ठाकरे म्हणाले की, माझ्या बहिण, भावांनी आमच्या परंपरेला पुढे न्यायचे आहे म्हणून शिस्तीने वागावे. आमच्यावर कोणी बोट दाखविण्याची हिंमत करू नये. सर्वोच्च न्यायालय शिवसेनेच्या वादावर जो निकाल देईल तो देशाच्या लोकशाहीचे भविष्य ठरविणारा निकाल असेल. न्यायदेवतेवर मी संशय घेतलेला नाही. आज लोकशाहीच्या विजयाचा दिवस आहे. न्यायदेवतेवरचा विश्वास सार्थ ठरला, असे ठाकरे म्हणाले.