काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी देशाबाहेर केलेल्या विधानावरून संसदेत गदारोळ माजलेला असताना रविवारी काँग्रेसनं केलेल्या ट्विटमुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. या ट्विटवरून भाजपा नेत्यांनी संतप्त भूमिका व्यक्त केली आहे. काँग्रेसनं रविवारी संध्याकाळी त्यांच्या ट्विटर हँडलवरून "सावरकर समझा क्या..नाम राहुल गांधी है" असं ट्विट केले आहे.
राहुल गांधींच्या या ट्विटवरुन भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी राहुल गांधी यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. राहुल गांधींनी लोकशाहीची सर्व मर्यादा ओलांडली आहे. काँग्रेस पक्ष मानसिक आजाराने ग्रस्त आहे. काँग्रेसला कुठलीच विचारधारा नाही. एका कुटुंबासमोर दुसरा विचार करू शकत नाही, असं जे. पी. नड्डा म्हणाले.
काँग्रेसच्या या ट्विटचे महाराष्ट्रात देखील पडसाद उमटत आहे. शिंदे गटाच्या प्रवक्ता शीतल म्हात्रे यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. कोण समजतंय तुम्हाला सावरकर? तुम्ही ही स्वतःला सावरकर समजण्याची चूक करु नका, असं शीतल म्हात्रेंनी म्हटलं आहे. तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या नखाची ही सर तुम्हांला नाही, असंही शीतल म्हात्रेंनी म्हटलं आहे. उध्वस्त गटाचे काय म्हणणे आहे याबद्दल?, असा सवाल उपस्थित करत शीतल म्हात्रेंनी ठाकरे गटालाही सवाल विचारला आहे.
दरम्यान, भारत जोडो यात्रेच्या अखेरच्या दिवशी श्रीनगरमध्ये राहुल गांधींनी महिलांबद्दल वक्तव्य केले होते. ज्यात महिलांच्या शोषणाबद्दल त्यांनी वक्तव्य केले होते. असे शोषण आजही इथल्या महिलांसोबत होतात, असे वक्तव्य राहुल गांधींनी केले होते. याच प्रकरणी स्पष्टीकरण मागण्यासाठी राहुल गांधींच्या घरी दिल्ली पोलीस दाखल झाले होते. नवी दिल्ली पोलीस दलाचे पोलीस उपायुक्तही पोहोचले होते. राहुल गांधींनी महिलांबद्दल केलेले वक्तव्य जाणून घेण्यासाठी १६ मार्च रोजी नोटीस पाठविण्यात आली होती.