Join us

'आपले सर्वच छक्के पंजे आता मुंबईकरांना समजतील...'; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2023 1:03 PM

ठाकरे गटाच्या या मोर्चावर शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी निशाणा साधला आहे.

मुंबई: महापालिका विसर्जित होऊन एक वर्ष लोटले तरी निवडणुका घेण्याची हिंमत नाही. सरकारकडून पालिकेच्या तिजोरीची लूट सुरू आहे. हा जनतेचा पैसा असून, त्याचा हिशोब द्यावाच लागेल. या भ्रष्टाचाराविरोधात शिवसेना १ जुलै रोजी महापालिकेवर विराट मोर्चा काढणार असून, आदित्य ठाकरे या मोर्चाचे नेतृत्व करेल, अशी घोषणा शिवसेनेचे पक्षप्रमुख (ठाकरे गट) उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी केली.

एकेकाळी मुंबई महापालिका साडेसहाशे कोटी रुपयांच्या तुटीत होती. पण, गेल्या काही वर्षात आमच्या कारभारात पालिकेकडे ९२ हजार कोटी रुपयांच्या ठेवी निर्माण झाल्या. ठेवीतून आतापर्यंत या सरकारने सात ते आठ हजार कोटी उधळले आहेत. या सगळ्या भ्रष्टाचाराचा जाब विचारण्यासाठी हा मोर्चा असल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितले. 

ठाकरे गटाच्या या मोर्चावर शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी निशाणा साधला आहे. आता आमदारांसोबतच मुंबई मनपाचे नगरसेवकसुध्दा एक एक करुन शिल्लकसेनेला सोडचिठ्ठी देतायत! कॅगची SIT समिती तपास करणार असल्याने उबाठा पक्षप्रमुखांच्या पायाखालची वाळू सरकरली, आपले सर्वच छक्के पंजे आता मुंबईकरांना समजतील या भितीने चोराच्या उलट्या बोंबा सुरु झाल्यात, असं शीतल म्हात्रेंनी म्हटलं आहे. 

दरम्यान, महापालिकेवर दरोडा टाकणाऱ्यांनीच मोर्चा काढावा? त्यांनी दरोडा टाकला. त्यातील हजारो कोटी रुपये कुठे गेले? आता आम्ही महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी एसआयटी नेमल्याने त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. दूध का दूध पानी का पानी होईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. 

चोराच्या उलट्या बोंबा- देवेंद्र फडणवीस

महापालिकेवर ठाकरेंनी मोर्चा काढणे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत. कॅगच्या अहवालाने महापालिकेतील घोटाळ्याचे सुतोवाच केले होते. त्यावर मुख्यमंत्र्यांनी एसआयटी नेमली आहे. एसआयटी चौकशीत अनेकांचे बुरखे फाटतील, काही जण तर नागडे होतील, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

टॅग्स :उद्धव ठाकरेनगर पालिकाएकनाथ शिंदे