- मनाेज माेघे
मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारची वर्षपूर्ती झाल्यानंतर सर्वांचेच लक्ष लागले होते ते मंत्रिमंडळ विस्ताराकडे. मात्र, शिवसेना-भाजपच्या आमदारांशिवाय हा विस्तार झाल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या विस्तारावर नाराज असल्याची चर्चा आहे. विस्तारावेळचा त्यांचा आणि शिंदे गटातील आमदारांचा चेहरा आणि देहबोलीच सर्वकाही सांगत होती, अशी टिप्पणीही नेत्यांकडून करण्यात आली.
सरकार स्थापनेपासून शिंदे गटाला निवडणूक आयोग, सुप्रीम कोर्टात सुनावण्यांना सामोरे जावे लागले. आयोगाच्या निकालानंतर त्याविरोधात कोर्टात ठाकरे गटाने आव्हान दिले. कोर्टाच्या निकालामुळे शिंदे गटावर अपात्रतेची टांगती तलवार अद्यापही कायम आहे. इतके धोके पत्करूनही या विस्तारात शिंदे गटाच्या एकालाही स्थान न मिळाल्याची सल शिंदे यांना असल्याची चर्चा आहे. तसेच, शिंदे गटाने वर्षपूर्तीआधीच जाहिरात प्रसिद्ध केली. त्यात एकनाथ शिंदे यांच्या बाजूने मांडलेला कौल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना रुचला नाही. मागील काही दिवसांत दोघांतील केमिस्ट्री जुळत नसल्याचे अनेक कार्यक्रमांत दिसले.