Join us

'बाळासाहेबांनी सांगितलंय, रडायचं नाही लढायचं'; आम्हाला डिवचू नका, शिंदे गटाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2022 11:52 AM

आमची काही चूक असेल तर दाखवून द्या, माफी मागू. पण उगाच सहन करणार नाही, असं भरत गोगावले यांनी सांगितलं. 

मुंबई- राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन शेवटाकडे येताना जोरदार तापलं आहे. आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. बुधावारी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर झालेल्या जोरदार राड्यानंतर वातावरण अजूनच जास्त तापलेलं आहे. आज देखील विधिमंडळाच्या पायऱ्यांवर भाजप आणि शिंदे गटाचे आमदारांनी घोषणाबाजी केली. तसेच माजी मंत्री आदित्य ठाकरे यांना शिंदे गटाकडून लक्ष्य करण्यात आलं. त्यानंतर शिंदे गटातील आमदार भरत गोगावले यांनी माध्यमांशी संवाद साधत आपली भूमिका स्पष्ट केली. 

आम्ही पोस्टर, बॅनरच्या माध्यमातुन वस्तुस्थिती मांडली आहे. सध्या मातोश्री दोन झाल्या आहेत. एक मातोश्री तीन मजली असून दुसरी मातोश्री आठ मजली आहे. आम्ही तीन मजली मातोश्रीचे पावित्र्य राखतोय. आठ मजली मातोश्रीच्या पायऱ्या चढताना पाय दुखतात, असा टोला भरत गोगावले यांनी लगावला. तसेच  प्रत्येकाने आपली मर्यादा राखली पाहिजे. आम्हाला डिवचू नका, आम्ही काही करणार नाही. पण तुम्ही अंगावर आलात, तर आम्ही हात बांधून बसणार का. आम्ही बाळासाहेबांचे सैनिक आहोत. बाळासाहेबांनी सांगितलं आहे रडायचं नाही, लढायचं. त्याप्रमाणे आम्ही लढत आहोत, असा इशारा भरत गोगावले यांनी विरोधकांना दिला. 

विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बुधवारी झालेला प्रकार निंदनीय होता. आमच्या घोषणा झाल्यानंतर त्यांनी यायला हवं होतं. मात्र त्यांनी आम्हाला डिवचलं. आम्ही काय बांगड्या घातल्या आहेत का?, आम्ही मर्द आहोत. त्यामुळे मर्दाच्या नादाला कोणी लागायचं नाही, असं भरत गोगावले यावेळी म्हणाले. त्याचप्रमाणे आमची काही चूक असेल तर दाखवून द्या, माफी मागू. पण उगाच सहन करणार नाही, असं भरत गोगावले यांनी सांगितलं. 

दरम्यान, व्यंगचित्राच्या बॅनरसह आज विधीमंडळाच्या पायऱ्यांवर शिंदे गटातील आमदारांकडून घोषणाबाजी करण्यात आली. आदित्य ठाकरेंविरोधात शिंदे गटातील आमदारांनी '५० खोके...मातोश्री ओके', '५० खोके...मुंबई मनपा ओके', 'युवराजांची दिशा नेहमीच चुकली', अशा घोषणा देखील दिल्या. शिंदे गटातील आमदारांची निदर्शनं सुरु असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानभवनात एन्ट्री झाली. यावेळी विधानभवनात जात असताना एकनाथ शिंदेंनी आमदारांना शांततेनं आंदोलन करा असा सल्ला दिला.

टॅग्स :एकनाथ शिंदेशिवसेनामहाराष्ट्र सरकारविधानसभा हिवाळी अधिवेशन