'कोण-कोणाचा पुतण्या आहे, यावर न्यायालय चालत नाही'; संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2022 04:43 PM2022-08-03T16:43:40+5:302022-08-03T16:43:53+5:30
सदर प्रकरणानंतर शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई- शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांच्याविरोधात बलात्कार पीडित तरूणीला धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल ना. म. जोशी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला आहे.
सदर प्रकरणातील मुख्य आरोपी रोहित कपूर हा केदार दिघे यांचा मित्र असून त्याने २८ जुलैला लोअर परळ येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये तरूणीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. धनादेश देण्याच्या बहाण्याने त्याने तरुणीला हॉटेलमध्ये बोलावून बलात्कार केला. त्यानंतर पैसे देऊन याबाबत कुठेही वाच्यता करू नये म्हणून सांगताच तरुणीने नकार दिला. त्यामुळे, दिघे यांनी तिला जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप तरुणीने केला आहे.
सदर प्रकरणानंतर शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते कुणाचे पुतणे आहेत, यापेक्षा त्यांनी काय कृत्य केलं, हे जास्त महत्त्वाचं आहे. कोण-कोणाचा मुलगा आहे किंवा कोण-कोणाचा पुतण्या आहे, यावर न्यायालय चालत नाही किंवा पोलीस यंत्रणा चालत नाहीत. तुम्ही गुन्हा केला असेल तर तुमच्यावर गुन्हा नोंद होईल आणि तुमच्यावर योग्य ती कारवाईदेखील होईल. गुन्हा केला नसेल तर तुमची निर्दोष मुक्तता होईल, असं संजय शिरसाट यावेळी म्हणाले.