Join us

भाजपच्या हालचालींवरून शिंदेंचे खासदार अस्वस्थ; भाजपने नेमलेल्या प्रभारींवरूनही धुसफूस

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2023 6:13 AM

प्रभारी नेमताना भाजपने आमच्याशी कोणतीही सल्लामसलत केली नाही, असे एका शिंदे समर्थक खासदाराने ‘लोकमत’ला सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : भाजपने राज्यातील सर्व ४८ लोकसभा मतदारसंघांसाठी प्रभारी नियुक्त करताना किमान शिवसेना (शिंदे गट) खासदारांच्या मतदारसंघातील खासदारांशी आधी चर्चा करणे आवश्यक होते; पण तसे काहीही झाले नाही. यावरून शिंदे समर्थक खासदारांमध्ये अस्वस्थता आहे. त्यातच शिंदे यांचे पुत्र खा. श्रीकांत शिंदे यांनी शुक्रवारी प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनाने या अस्वस्थतेत भर पडल्याचे म्हटले जाते. 

शिंदे समर्थक मुंबईतील खा. गजानन कीर्तिकर यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले होते की, आमच्या खासदारांना भाजपकडून सापत्न वागणूक दिली जाते. ‘एनडीए’चा घटक पक्ष म्हणून आम्हाला वागणूक दिली जात नाही. त्यानंतर त्यांनी या विधानावर यूटर्न घेतला होता; पण त्यानिमित्ताने शिंदेंच्या खासदारांमधील खदखद समोर आली होती. त्यातच शिंदेंचे खासदार असलेल्या १३ लोकसभा मतदारसंघांमध्ये; तसेच शिवसेनेने गेल्यावेळी लढविलेल्या मतदारसंघांमध्येही भाजपने लोकसभा निवडणूक प्रभारी नियुक्त केल्याने शिंदे गटात चलबिचल असल्याचे म्हटले जाते. 

शिवसेनेच्या खासदारांचे भाजपच्या ज्या नेत्यांशी चांगले संबंध नाहीत त्यांनाच प्रभारी नेमण्यात आल्याची काही उदाहरणे आहेत. बुलढाणा मतदारसंघाचे पदाधिकारी म्हणून माजी आमदार विजयराज शिंदे यांना नेमण्यात आले. शिंदे अनेक वर्षे शिवसेनेचे आमदार होते. त्यावेळी त्यांच्यात व स्थानिक शिंदे समर्थक खासदार प्रतापराव जाधव यांच्यातून विस्तवही जात नव्हता. आज जिल्ह्यातील शिंदेसेनेवर खा. जाधव यांचे वर्चस्व आहे.  नेमके शिंदेंनाच प्रभारी नेमल्याने लोकसभा निवडणुकीसाठी भाजप व शिंदेसेनेत समन्वय कसा राहील, याबाबत शंका उपस्थित केली जात आहे.

सल्लामसलत केली नाही !

भाजपने प्रभारी देऊन स्वबळाची तयारी तर सुरू केली नाही ना, अशी शंकाही घेतली जात आहे. शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेला जे मतदारसंघ सुटतील तिथे भाजपचे प्रभारी त्यांना सहकार्य करतील, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, हे प्रभारी नेमताना भाजपने आमच्याशी कोणतीही सल्लामसलत केली नाही, असे एका शिंदे समर्थक खासदाराने ‘लोकमत’ला सांगितले.

 

टॅग्स :शिवसेनाभाजपा