मुंबई - शिवसेनेत पडलेल्या उभ्या फुटीनंतर यावर्षी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि शिंदे गट यांच्या होणाऱ्या दसरा मेळाव्यांकडे राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावर तर शिंदे गटाचा दसरा मेळावा हा बीकेसीमधील मैदानत पार पडला. या मेळाव्यांमध्ये किती शिवसैनिकांची उपस्थिती होती याबाबतचे वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. आता पोलिसांनीही शिवतीर्थ आणि बीकेसी येथील दसरा मेळाव्यात किती शिवसैनिकांची उपस्थिती होती. याबाबतची अंदाजित आकडेवारी मांडली आहे.
पोलिसांनी सांगितलेल्या या अंदाजित आकडेवारीनुसार मुंबईतील शिवतीर्थावर झालेल्या उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी सुमारे एक लाख शिवसैनिक उपस्थित होते. तर एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली बीकेसी येथील मैदानात झालेल्या शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला दोन लाख शिवसैनिकांची उपस्थिती होती, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
या मेळाव्यांसाठी दोन्ही गटांकडून जय्यत तयारी करण्यात आली होती. शिंदेगटाने तर शिवसैनिकांना आणण्यासाठी हजारो एसटी बसचं बुकिंग केलं होतं. या दसरा मेळाव्यासाठी हजारो पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आळा होता. पोलीस दलाकडून दोन्ही मेळाव्यांची सुरक्षाव्यवस्था चोखपणे पार पाडण्यात आल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलिसांचे आभार मानले आहेत.
दरम्यान, दसरा मेळाव्यात संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि इतर बंडखोरांवर टीकास्र सोडले. मी आजारी असताना ज्यांच्यावर जबाबदारी सोपवली ते कटप्पा निघाले. अडीच वर्षं मुख्यमंत्रिपद वाटून घेण्याबाबत ठरलं होतं हे आई-वडिलांची शपथ घेऊन सांगतो, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच तुमचा नेता हा पाकिस्तानात जाऊन केक खाऊन आला होता, तुम्ही आम्हाला काय हिंदुत्व शिकवणार? असा टोला त्यांनी भाजपाला लगावला होता.
दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनीही उद्धव ठाकरेंच्या टीकेला आक्रमकपणे उत्तर दिले. आम्ही गद्दार नाही तर आम्ही गदर केला म्हणजेच उठाव केला. तुम्ही मला कटप्पा म्हणालात, कटप्पा प्रामाणिक होता. तुम्ही तर सत्तेसाठी दुटप्पी भूमिका घेतलीत. स्वत:च्या वडिलांचे विचार विकले, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली.