शिंदे की ठाकरे? शिवाजी पार्कवर दसऱ्याला आवाज कोणाचा...?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2023 11:10 AM2023-09-30T11:10:56+5:302023-09-30T11:11:18+5:30
‘अधिकृत पक्ष’ या निकषावर शिंदे गटाचे पारडे जड, अधिकाऱ्यांचे माैन
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : शिवाजी पार्क मैदानात दसरा मेळाव्याला परवानगी मिळावी, यासाठी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत गेल्या वर्षी रंगलेल्या कलगीतुऱ्याची यंदाही पुनरावृत्ती होणार आहे. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य आणि अर्ज करणाऱ्या पक्षाचा अधिकृत दर्जा हा पालिकेचा निकष लक्षात घेता, यंदा शिंदे यांच्या शिवसेनेला शिवाजी पार्क मैदान गाजविण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना अधिकृत शिवसेना असल्याचा निर्वाळा याआधीच दिला आहे.
शिवसेना नेते अरविंद सावंत यांच्याशी संपर्क साधला असता, मैदानासाठी आम्ही केव्हाच अर्ज केला आहे, असे त्यांनी सांगितले. ‘जी-उत्तर’ विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याशी संपर्क साधला असता, दोन्ही गटांचे अर्ज प्राप्त झाले असून, कोणत्या गटाचा अर्ज आधी आला, याविषयी आम्ही ‘कन्फर्मेशन’ देऊ शकत नाही, असा पवित्रा घेतला. मात्र, शिंदे यांच्या शिवसेनेचा अर्ज आधी आल्याचे कळते.
अर्ज कोणाचा आधी आला, या मुद्द्यासोबत अर्ज मंजुरीबाबत आणखीही निकष आहेत. ‘प्रथम अर्ज करणाऱ्यास साधारणपणे मंजुरी मिळते. त्याचबरोबर पक्षाचा अधिकृत दर्जा तपासला जातो, एकूणच नियमांच्या अधीन राहून निर्णय घेतला जाईल’, असेही या अधिकाऱ्याने सांगितले. अधिकृत पक्षाचा दर्जा हा निकष लागू झाल्यास उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेची अडचण होईल. मागील वर्षी दोन्ही गटांत मैदानासाठी तुंबळ संघर्ष झाला होता. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने सर्वांत आधी अर्ज केला होता, परंतु त्यांना परवानगी देण्याच्या मुद्द्यावरून पालिका स्तरावर बरेच दिवस चालढकल सुरू होती. सगळ्यात प्रथम अर्ज करूनही परवानगी दिली जात नाही, अशी तक्रार करीत ठाकरे यांच्या गटाने न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने या प्रकरणात हस्तक्षेप केल्यानंतर दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटाला शिवाजी पार्कचा ताबा मिळाला होता. त्यामुळे शिंदे यांच्या शिवसेनेला वांद्रे-कुर्ला संकुलातील मैदानावर मेळावा घ्यावा लागला होता. याही वर्षी पालिकेची तारांबळ उडणार आहे. शिवाजी पार्क मैदान मिळावे, हा मुद्दा शिंदे यांच्या शिवसेनेकडून प्रतिष्ठेचा केला जाऊ शकतो.