मुंबई- शिंदे सेना आणि वैद्यकीय मदत हे अतूट नात असल्याचे गौरवोद्गार राज्याचे उपमुख्यमंत्री व शिंदे सेनेचे मुख्यनेते एकनाथ शिंदे यांनी आज दुपारी मालाड येथे काढले.हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष तथा शिंदे सेनेचे सचिव सिद्धेश कदम यांनी दिंडोशी मालाड( पूर्व) सन्मित्र क्रीडागंण( म्हाडा मैदान),ओबेरॉय मॉल जवळ महाआरोग्य शिबिराचे आयोजन केले होते,त्यावेळी ते बोलत होते.
सकाळी ९ ते ५ या वेळेत आयोजित या महाआरोग्य शिबिरात मोफत तपासण्यांसोबतच औषधोपचार तसेच रुग्णांना व्हील चेअर्स, वॉकर्स, चष्मे आणि इतर वैद्यकीय सामग्री देखील मोफत वाटण्यात आली. विशेष म्हणजे या शिबिरात तब्बल १० हजारांहून अधिक नागरिकांनी लाभ घेतला असून नागरिकांचा मोठा प्रतिसाद या महाआरोग्य शिबिराला लाभला.
या महाआरोग्य शिबिराला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,शिंदे सेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम, शिंदे सेनेचे लोकसभेतील गटनेते,खासदार डॉ. श्रीकांत शिंदे उपस्थिती दर्शवून या शिबिराच्या आयोजनाबाबत सिद्धेश कदम यांची पाठ थोपटून त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी शिंदे सेनेच्या नेत्या डॉ.नीलम गोरे, खासदार रविंद्र वायकर, संजय मोरे, शीतल म्हात्रे,आमदार प्रकाश सुर्वे,आमदार मनिषा कायंदे, मीना कांबळे, किरण पावसकर, डॉ.दीपक सावंत, संजय मोरे, भाऊसाहेब चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.