विधान परिषदेसाठी मुंबई शिक्षक मतदारसंघाचे शिंदे सेनेचे शिवाजी शेंडगे
By मनोहर कुंभेजकर | Published: June 13, 2024 05:12 PM2024-06-13T17:12:19+5:302024-06-13T17:12:57+5:30
मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी शिंदे सेनेने आपला उमेदवार म्हणून शिवाजी शेंडगे यांचे नाव घोषित केले आहे.
मुंबई - विधानपरिषदेच्या ४ जागांसाठी २६ जून रोजी निवडणूक होणार आहे. मुंबई पदवीधर मतदारसंघ, कोकण पदवीधर मतदारसंघ, मुंबई शिक्षक मतदार संघ व नाशिक शिक्षक मतदारसंघ असे या निवडणुकीचे स्वरूप असणार आहे. यातील मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी शिंदे सेनेने आपला उमेदवार म्हणून शिवाजी शेंडगे यांचे नाव घोषित केले आहे. शिंदे सेनेचे सचिव संजय मोरे यांनी पत्रकार परिषदेत त्यांच्या नावाची घोषणा केली.
या निवडणुकीत उद्धव सेनेतून ज.मो.अभ्यंकर,भाजपातून शिवनाथ दराडे,समाजवादी गणतंत्र पक्षाचे सुभाष मोरे, शिंदे सेनेचे शिवाजी शेंडगे,राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शिवाजीराव नलावडे यांच्यात मैत्रीपूर्ण चुरशीची पंचरंगी लढत अपेक्षित आहे.
कोण आहेत शिवाजी शेंडगे
शिवाजी शेंडगे यांनी याआधी २०१८ मध्ये शिक्षक मतदारसंघाची निवडणूक लढवली होती. त्यात त्यांनी दुसऱ्या क्रमांकाचे मताधिक्य घेऊन चांगले यश मिळवले होते. शिक्षण क्षेत्रातील त्यांचा अनुभव दांडगा आहे.
शिवाजी शेंडगे म्हणाले की, मी स्वतः शिक्षक असून मागील १५ वर्षे शिक्षकांच्या हितासाठी व कल्याणासाठी प्रयत्नरत आहे, शिक्षकांच्या हितासाठी अनेक योजनांना मार्गी लावण्यासाठी झटत आहे. जशी जुनी पेन्शन योजना, २००५ नंतर निवृत्त झालेल्या शिक्षकांना पगारातील ५०% रक्कम व महागाई भत्ता पेन्शन म्हणून मिळणार आहे. १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त झालेल्या पर्मनंट किंवा नंतर ग्रँड मिळालेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय झाला आहे. लवकरच त्याचा जीआर निघणार आहे. अंशतः अनुदानित किंवा विना अनुदानित शिक्षकांना ६०% अनुदान म्हणजेच पगार सुरु केला आहे व लवकरच २०% टप्पा वाढवून ८०% टक्के अनुदान केले जाणार आहे. त्याचबरोबर खासगी (प्रायव्हेट) शाळांमधील शिक्षकांना ज्यांना पगाराची गॅरंटी नसते त्यांना मिनिमम सॅलरी ऍक्ट आणून किमान ३५ ते ५० हजार पगार मिळत पाहिजे व त्यांच्या सर्व्हिस गॅरंटीसाठी एक अयोग नेमला जावा व कॅशलेस मेडिक्लेम सर्व शिक्षकांना मिळावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. यामधील अनेक गोष्टी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी मार्गी लावल्या आहेत. तर उर्वरित गोष्टी सुद्धा लवकरच पूर्ण होणार आहेत.