शिंदेसेनेचे ठरले, मविआचे ठरेना, मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघावर काॅंग्रेसचाही डाेळा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2024 01:03 PM2024-04-01T13:03:14+5:302024-04-01T13:04:12+5:30

Mumbai News: धारावीपासून ते थेट प्रभादेवीपर्यंत पसरलेला दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ नेमका गड कुणाचा राहणार हे २० मे रोजी होणाऱ्या निवडणुकांत मतदारराजा ठरवणार आहे. शिंदेसेनेकडून खासदार राहुल शेवाळे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

Shinde' Shiv sena's decision, MVA's decision not, Congress's Eyes on Mumbai South Central Constituency | शिंदेसेनेचे ठरले, मविआचे ठरेना, मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघावर काॅंग्रेसचाही डाेळा

शिंदेसेनेचे ठरले, मविआचे ठरेना, मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघावर काॅंग्रेसचाही डाेळा

- मनोज मोघे
मुंबई - धारावीपासून ते थेट प्रभादेवीपर्यंत पसरलेला दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ नेमका गड कुणाचा राहणार हे २० मे रोजी होणाऱ्या निवडणुकांत मतदारराजा ठरवणार आहे. शिंदेसेनेकडून खासदार राहुल शेवाळे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. दुसरीकडे विरोधकांमध्ये मात्र अद्यापही दिलजमाई झालेली नाही. उद्धवसेनेकडून थेट राज्यसभा खासदार अनिल देसाई यांचे नाव जाहीर करण्यात आले असले, तरी काँग्रेसकडूनही या मतदारसंघावरचा दावा सोडण्यात आलेला नाही. त्यामुळे शिंदेसेनेविरोधात महाविकास आघाडी की शिंदेसेना, उद्धवसेना आणि काँग्रेस अशी तिहेरी लढत पाहायला मिळणार याचा ‘सस्पेन्स’ कायम आहे.

दक्षिण-मध्य मुंबई हा खऱ्या अर्थाने बहुधर्मीय आणि बहुभाषिक मतदारसंघ. अणुशक्तीनगर, चेंबूर, धारावी, सायन कोळीवाडा, प्रतीक्षा नगर, वडाळा, नायगाव, माहीम, प्रभादेवी असा या मतदारसंघाचा विस्तार आहे. 

कम्युनिस्ट पक्षापासून ते जनता पार्टी, काँग्रेस, शिवसेना पक्षाच्या दिग्गजांनी या मतदारसंघाचे लोकसभेत नेतृत्व केले आहे. १९८९ पासून तब्बल आठवेळा शिवसेनेचा खासदार येथे निवडून आला. त्याचप्रमाणे काँग्रेसला पाच वेळा येथून संधी मिळाली. कष्टकरी जनता आणि बहुजन समाज यांचे मत निर्णायक ठरते. धारावीतील मध्यम व लघू उद्योगातील मजूरवर्ग, सायन, वडाळा, नायगाव भागातील कामगारवर्ग, तर नायगाव, माहीम, प्रभादेवी येथील मध्यमवर्ग या भागातील खरे मतदार आहेत. त्याचप्रमाणे धारावीतील अल्पसंख्याक व दलित मते महत्त्वाची मानली जातात.

उद्धवसेना की शिंदेसेना?
उद्धवसेनेच्या स्थानीय लोकाधिकार समितीचा कणा असलेले राज्यसभा खासदार अनिल देसाई यांची उमेदवारी जाहीर झाली असली तरी काँग्रेस आमदार वर्षा गायकवाड यादेखील येथे निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. काँग्रेससोबत दिलजमाई न झाल्यास येथे तिरंगी लढत होईल. दिलजमाई झाली तर उद्धवसेना - शिंदेसेना अशी थेट लढत होईल. 

निर्णायक मुद्दे
 धारावी पुनर्विकास.
 सूक्ष्म व लघू उद्योगांच्या पुनर्विकासानंतर काय?
 विकासाची आश्वासने पूर्ण कधी होणार?
 नायगावमधील बीडीडी चाळींचा पुनर्विकास
 झोपडपट्ट्यांच्या पुनर्विकास 
 आरोग्यविषयक 
व पायाभूत सोयी-सुविधा

प्रकाश फातर्पेकर (उद्धवसेना)
नवाब मलिक (अजित पवार गट)
वर्षा गायकवाड (काँग्रेस)
तमिल सेल्वन ( भाजप)
कालिदास कोळंबकर (भाजप)
सदा सरवणकर (शिंदेसेना)

Web Title: Shinde' Shiv sena's decision, MVA's decision not, Congress's Eyes on Mumbai South Central Constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.