मुंबई - उत्तर-पश्चिम मतदारसंघात मराठी किंवा अमराठी यापैकी कोणाला सर्वाधिक पाठिंबा मिळू शकतो, याचं सर्वेक्षण शिंदे सेनेकडून करण्यात आले आहे. ही जागा शिंदे सेना लढवणार असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता पर्यंत पक्षातील पदाधिकारी, अभिनेते अशी अनेकांशी चर्चा केली होती.येथे उद्धव सेनेने उपनेते अमोल कीर्तिकर यांना तिकीट दिले आहे.त्यामुळे सक्षम उमेदवाराच्या शोधात शिंदे सेना आहे.मात्र अजूनही येथे सक्षम उमेदवार त्यांना मिळालेला नाही ही वस्तुस्थिती आहे.
या मतदार संघात सक्षम मराठी उमेदवार द्यावा अशी विनंती येथील 17 माजी नगरसेवकांनी आणि पदाधिकाऱ्यांनी येथे मराठी चेहरा द्यावा अशी मागणी अलीकडेच त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. दरम्यान माजी आरोग्य मंत्री व राज्याच्या कूपोषण निर्मूलन टास्क फोर्स समितीचे अध्यक्ष डॉ.दीपक सावंत यांच्याशी उमेदवारी बद्धल मुख्यमंत्र्यांनी नुकतीच सविस्तर चर्चा केली होती.याबाबत त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याला दुजोरा दिला.मी माझा बायोडाटा त्यांना दिला असून मुख्यमंत्री याबाबत निर्णय घेतील असे त्यांनी सांगितले.
जोगेश्वरी पूर्वचे शिंदे सेनेचे आमदार रवींद्र वायकर यांच्याशी देखिल मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली, मात्र जोगेश्वरीच्या भाजप पदाधिकाऱ्यांचा त्यांना कडाडून विरोध आहे.येथील भाजप उपाध्यक्ष व राणे समर्थक दत्ता शिरसाट यांनी वायकर यांना येथून तिकीट दिल्यास आपण अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शिंदे सेनेने मराठी अभिनेत शरद पोंक्षे, सचिन पिळगावकर आणि सचिन खेडेकर यांची सध्या चाचपणी सुरू आहे.2014 ला मराठी अभिनेता महेश मांजरेकर यांना उत्तर पश्चिम मुंबईतून मनसेने खासदार गजानन कीर्तिकर यांच्या विरोधात तिकीट दिले होते,मात्र त्यांना 66088 मते मिळाली होती. खासदार सुनील दत्त वगळता अभिनेते या मतदार संघात तितकेसे चालले नाही.तर उत्तर मुंबईतून 2004 साली अभिनेता गोविंदा यांनी पाच वेळा खासदार असलेले राम नाईक यांचा पराभव केला होता,मात्र गोविंदा काही प्रभाव येथे पाडू शकला नव्हता.त्यामुळे अभिनेते निवडून आल्यावर किती लोपयोगी कामे करतील याबाबत मतदार साशंक आहे.