मुंबई : मुंबई विद्यापीठाचे नवे कुलगुरू कोण असणार? या एका प्रश्नाने राजकीय आणि विद्यापीठ प्रशासन डावलून निघाले होते, सगळ्यांचीच उत्सुकता शिगेला पोहोचली आणि अखेर राज्यपालांनी मुंबई विद्यापीठाची धुरा रुईयाचे प्राचार्य असलेले डॉ. सुहास पेडणेकर यांच्या हाती सोपविली. राज्यपालांनी बराच वेळ घेऊन डॉ. पेडणेकर यांचे नाव घोषित केले आणि त्यांच्या गळ्यात कुलगुरूपदाची माळ घातली खरी. मात्र, मुंबई विद्यापीठाच्या व्यवस्थापनाची त्यांना कुलगुरूपदी विराजमान करण्याची इच्छा दिसत नाही.मुंबई विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर अद्यापही विद्यमान कुलगुरू म्हणून कोल्हापूरचे डॉ. देवानंद शिंदे यांचेच नाव आहे.आॅनलाइन मूल्यांकनाच्या घोळानंतर डिजिटायझेशनमध्ये मुंबई विद्यापीठाला सुधारणेला प्रचंड वाव असल्याचे तर स्पष्ट झाले. मात्र, नवीन कुलगुरू मिळाल्यानंतर त्यांची माहिती संकेतस्थळावर विद्यापीठाकडून अद्ययावत करण्यात न आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.विद्यापीठाच्या संकेतस्थळ सिनेट सदस्यांची यादी, स्टुडंट कौन्सिलच्या सदस्यांची यादी घोषित झाल्यावर अद्ययावत करण्यात आले आहे. मात्र, कुलगुरूंची माहिती अद्ययावत केली नसल्याने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.कुलगुरूंना मुंबई विद्यापीठाच्या या संथ आणि ढिसाळ कारभारावर नियंत्रण आणणे आवश्यक असल्याचे मत शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.
विद्यापीठाच्या संकेतस्थळावर अजून कुलगुरूपदी ‘शिंदे’च!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 02, 2018 6:38 AM