Join us

पालिकेत शिंदे-ठाकरे गटात राडा; शिवसेना कार्यालय ताब्यात घेण्यावरून घोषणाबाजी, कार्यकर्ते भिडले

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2022 7:47 AM

मुंबई महापालिकेतील शिवसेना कार्यालय ताब्यात घेण्यावरून शिंदे गट आणि ठाकरे गटात जोरदार राडा झाला.

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई: मुंबई महापालिकेतील शिवसेना कार्यालय ताब्यात घेण्यावरून शिंदे गट आणि ठाकरे गटात बुधवारी जोरदार राडा झाला. शिवसेना कार्यालयात ठाकरे गटाचे कोणीच कार्यकर्ते नसल्याचे पाहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे खासदार, माजी नगरसेवक व कार्यकर्ते घुसले. याची माहिती मिळताच ठाकरे गटाचे शिवसैनिकही त्या ठिकाणी दाखल झाले. दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. इतकेच नव्हे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून पोलिस व पालिकेतील सुरक्षारक्षकांनी सर्वांना कार्यालयाबाहेर काढले.

शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर शिवसेनेची कार्यालये, शाखा ताब्यात घेण्यावरून राज्यात ठाकरे गट व शिंदे गटात वाद सुरू आहेत. ठाणे, कल्याण, डोंबिवलीनंतर त्याचे लोण मुंबईत पसरले. बुधवारी शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे, उपनेते यशवंत जाधव, ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के, प्रवक्त्या शीतल म्हात्रे आदींनी मुंबईतील विकासकामांच्या निमित्ताने बुधवारी पालिका मुख्यालयात आयुक्त इकबाल चहल यांची भेट घेतली. त्यानंतर या सर्वांनी पालिकेतील शिवसेना पक्ष कार्यालयात जाऊन ठाण मांडले. त्यावेळी पक्ष कार्यालयात फक्त कर्मचारी वगळता उद्धव ठाकरे गटाचे कोणीही उपस्थित नव्हते. 

मात्र या घटनाप्रकाराची माहिती मिळताच शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे विभाग प्रमुख पांडुरंग सकपाळ, आशिष चेंबूरकर, माजी नगरसेवक सचिन पडवळ, रमाकांत रहाटे, सदानंद परब आदींनी पक्ष कार्यालयात धाव घेतली. अखेर पोलिसांसह पालिकेचे सुरक्षारक्षक त्या ठिकाणी दाखल झाले. दोन्ही गटांची समजूत काढून त्यांनी दोन्ही  कार्यकर्त्यांना कार्यालयाबाहेर काढले. दरम्यान, या प्रकारामुळे पालिकेत पाऊण तास तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

आम्ही असताना येऊन दाखवा ना? 

- विभाग प्रमुख पांडुरंग सकपाळ येताच राहुल शेवाळे व यशवंत जाधव हे पक्ष कार्यालयातून बाहेर पडले. हे पाहताच सकपाळ यांचा पारा चढला. 

- हिंमत असेल तर आम्ही आलो असताना कार्यालयात घुसून दाखवा ना? तेवढ्यात राहुल शेवाळे यांनी, ‘’तुम्ही बसा आम्हीही बसतो’’,  असे सांगत उत्तर दिले. त्यावेळी दोन्ही गटांमध्ये जोरदार घोषणाबाजी झाली. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :मुंबई महानगरपालिका