विधानसभेला १०० जागा लढवण्याचे शिंदेसेनेचे लक्ष्य! मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील बैठकीत भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2024 05:25 AM2024-07-19T05:25:02+5:302024-07-19T05:26:04+5:30
निवडणुकीआधी पक्षाची सदस्य नोंदणी आणि पदाधिकाऱ्यांची रिक्त पदे भरण्यावर भर द्या. सरकारच्या याेजना घराघरात पोहोचवा, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदार आणि आमदारांना दिले.
मुंबई : येत्या विधानसभा निवडणुकीत १०० जागा लढवण्यासाठी शिंदेसेना आग्रही असून, विधानसभानिहाय १०० प्रभारी व निरीक्षकांची नियुक्ती करण्यात येणार आहे.
निवडणुकीआधी पक्षाची सदस्य नोंदणी आणि पदाधिकाऱ्यांची रिक्त पदे भरण्यावर भर द्या. सरकारच्या याेजना घराघरात पोहोचवा, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदार आणि आमदारांना दिले.
मुख्यमंत्री शिंदे यांनी पक्षातील खासदार, आमदार तसेच पदाधिकाऱ्यांची बैठक गुरुवारी वर्षा निवासस्थानी घेतली. लोकसभा निवडणुकीत सात जागांवर विजय मिळाल्याने शिंदेसेनेचा आत्मविश्वास वाढला आहे. त्यामुळे सर्वाधिक १०० जागांची आग्रही मागणी या बैठकीदरम्यान करण्यात आली. शिवसेनेचे ४० आमदार आहेत. लोकसभा निवडणुकीतही चांगली कामगिरी केली आहे. राज्यात महायुती म्हणून निवडणूक लढली जाणार आहे. समसमान जागा मिळाव्यात, अशी भूमिका बैठकीत मांडण्यात आली.
भाजपच्या शीर्ष नेतृत्त्वाकडून विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपाबाबत निर्णय घेतला जाणार आहे. केंद्रीय नेतृत्त्वाकडे शिंदेसेनेला किती जागा मिळाव्यात, या संदर्भातला अहवाल पाठवला आहे. मात्र, आतापासूनच तयारीला लागा, पक्षातील मरगळ झटका. एकमेकांशी समन्वय साधा, प्रत्येक पदाधिकाऱ्याला सामावून घ्या, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठकीत दिल्या.