मुंबई : भाऊचा धक्का ते मांडवा या दरम्यान सुरू करण्यात येणाऱ्या रो रो सेवेसाठी ग्रीसहून निघालेले जहाज शुक्रवारी मुंबईत दाखल झाले. या जहाजाच्या विविध चाचण्या, विविध परवानग्या मिळाल्यावर ही सेवा पुढील १५-२० दिवसांत म्हणजे मार्च महिन्यात सुरू होईल, असा विश्वास महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाने व्यक्त केला आहे.
मुंबई ते मांडवा दरम्यान रस्त्याने जाण्यासाठी १०९ किमी अंतर पार करावे लागते, मात्र रो रो सेवेमुळे हे अंतर समुद्रीमार्गे केवळ १९ किमी इतके कमी होईल. सध्या मुंबई ते मांडवा जाण्यासाठी सुमारे तीन तासांचा कालावधी लागतो. रो रोमुळे तो अवघ्या पाऊण तासावर येईल. या सेवेच्या माध्यमातून प्रवासी आपल्या वाहनांना या जहाजात घेऊन मांडवा येथे व तिथून जवळच्या पर्यटनस्थळी जाऊ शकतील. यामध्ये एका वेळी १८० चारचाकी वाहने व प्रवासी प्रवास करू शकतील.
या जहाजाची किंमत ५० कोटी रुपये असून खासगी संस्थेला ही सेवा चालवण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. या सेवेसाठी विविध पायाभूत सुविधा तयार करण्यासाठी महाराष्ट्र मेरीटाइम बोर्ड व मुंबई पोर्ट ट्रस्टतर्फे १८३ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. या सेवेचे शुल्क ठरवण्याचा अधिकार खासगी संस्थेला देण्यात आला असला तरी दर सर्वसामान्य प्रवाशांना परवडणारे असावेत, याकडे विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.नोंदणीसाठी लागणार १० दिवसरो रो सेवेसाठी आवश्यक असलेले जहाज ग्रीसवरून मुंबईत दाखल झाले आहे. यापूर्वीच ते येण्याची शक्यता होती, मात्र खराब हवामानामुळे ते शुक्रवारी आले. त्याच्या नोंदणीसाठी १० दिवसांचा कालावधी लागेल व त्यानंतर त्याची चाचणी होऊन त्यानंतरच सेवा सुरू करण्यात येईल.- डॉ. एन. रामास्वामी, मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र मेरीटाइम बोर्ड