जलवाहतूक महागली, दोन वर्षांनंतर दरवाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2020 05:11 AM2020-03-05T05:11:56+5:302020-03-05T05:12:02+5:30

गेट वे ऑफ इंडिया ते एलिफंटा आणि भाऊचा धक्का ते मांडवा जाण्यासाठी सध्या सुरू असलेल्या जलवाहतुकीमध्ये सुमारे १० ते १५ टक्क्यांची दरवाढ झाली आहे.

Shipping expensive, hike after two years | जलवाहतूक महागली, दोन वर्षांनंतर दरवाढ

जलवाहतूक महागली, दोन वर्षांनंतर दरवाढ

Next

मुंबई : गेट वे ऑफ इंडिया ते एलिफंटा आणि भाऊचा धक्का ते मांडवा जाण्यासाठी सध्या सुरू असलेल्या जलवाहतुकीमध्ये सुमारे १० ते १५ टक्क्यांची दरवाढ झाली आहे. मुंबई पोर्ट ट्रस्टने दरवाढीस मंजुरी दिली आहे. १ मार्चपासून दरवाढ लागू झाल्याने प्रवाशांच्या खिशाला आर्थिक भुर्दंड बसत आहे. मात्र डिझेलच्या दरात व विविध करांमध्ये वाढ झाल्याने दोन वर्षांनंतर करण्यात आलेली दरवाढ योग्य असल्याचा दावा वाहतूकदारांनी केला आहे.
लाकडी लाँचेंसच्या दरात १० टक्के व कॅटमरानच्या दरात १५ टक्के वाढ झाली आहे. सध्या भाऊचा धक्का ते मांडवा जाण्यासाठी १०५ रुपये तिकीट आकारले जात होते. त्यामध्ये वाढ होऊन आता ११५ रुपये आकारले जात आहेत. तर गेट वे आॅफ इंडिया ते एलिफंटा जाण्यासाठी असलेले तिकीट १८० रुपयांवरून २०० रुपये करण्यात आले आहे.
एकीकडे जलवाहतुकीला प्रोत्साहन दिले जात असताना तिकीट दरवाढ झाल्याने प्रवाशांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. तर, महागाईत सातत्याने झालेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेली ही दरवाढ अतिशय सामान्य असल्याचे मत वाहतूकदारांनी व्यक्त केले आहे. यापूर्वी १ जानेवारी २०१८ रोजी जलवाहतुकीचे दर वाढविण्यात आले होते.
>प्रति प्रवासी घेतल्या जाणाऱ्या लेव्हीमध्ये मोठी वाढ
जलवाहतूकदारांनी दिलेल्या माहितीनुसार, गेली दोन वर्षे हे दर स्थिर होते. या कालावधीत अनेकदा डिझेल व इतर सामग्रीचे दर वाढले. मुंबई पोर्ट ट्रस्टकडून प्रति प्रवासी घेतल्या जाणाºया लेव्हीमध्ये मोठी वाढ झाली. पूर्वी प्रति प्रवासी दोन रुपये असलेली लेव्ही गेल्या काही काळात ५ रुपयांवर गेली होती. आता त्यामध्ये तिकीट दरानुसार टप्प्याप्रमाणे वाढ करण्यात आली आहे. त्याचा फटका जलवाहतूकदारांना बसू लागला आहे. तिकीट दर १०० रुपयांपर्यंत १० रुपये, १०१ ते १५० रुपयांपर्यंत १५ रुपये, १५१ ते २०० रुपयांपर्यंत २० रुपये प्रति प्रवासी मुंबई पोर्ट ट्रस्टला द्यावे लागतात. ही रक्कम थेट जलवाहतूकदारांना द्यावी लागते. त्यामुळे कराच्या रकमेत दरवाढ होत असल्याने त्यांना आर्थिक फटका बसू लागला आहे.

Web Title: Shipping expensive, hike after two years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.