Join us

भारतीय खलाशी असलेल्या जहाजांना चीनमध्ये प्रवेश नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 4:05 AM

सुहास शेलारलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोना विषाणूचा जनक असलेल्या चीनने पुन्हा एकदा भारताविरोधात मोहीम उघडली आहे. भारतीय ...

सुहास शेलार

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोना विषाणूचा जनक असलेल्या चीनने पुन्हा एकदा भारताविरोधात मोहीम उघडली आहे. भारतीय खलाशी असलेल्या जहाजांना प्रवेश न देण्याचे फर्मान चिनी सरकारने काढल्यामुळे कोट्यवधींचा व्यापार ठप्प झाल्याची माहिती एका शिपिंग कंपनीशी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. चीनच्या या आडमुठेपणामुळे शिपिंग कंपन्यांसह २ लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांसमोर पेच निर्माण झाला आहे.

लसीकरण पूर्ण न झाल्याने आधीच भारतीय खलाशांना परदेशी जहाजावर घेतले जात नाही. तर जे खलाशी दुसऱ्या लाटेआधी रुजू झाले त्यांच्यासमोर चीनने अडचणी निर्माण केल्या आहेत. ज्या भारतीय खलाशाचे लसीकरण पूर्ण झालेले नसेल, त्यांना चीनमध्ये प्रवेश न देण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. असे खलाशी आढळल्यास जहाजाला चीनमधील कोणत्याही बंदरावर प्रवेश दिला जात नसल्याने शिपिंग कंपन्यांसमोर पेच निर्माण झाला आहे. यामुळे कोट्यवधींचा व्यापार ठप्प होण्याबरोबरच भारतीय खलाशांच्या रोजगारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याची माहिती ऑल इंडिया सिफेरर्स युनियनचे कार्याध्यक्ष अभिजित सांगळे यांनी दिली.

दुसऱ्या लाटेआधी जहाजांवर रुजू झालेल्या बहुतांश भारतीय खलाशांचे लसीकरण झालेले नाही. परंतु, हे खलाशी जहाजावरील कर्मचाऱ्यांच्या व्यतिरिक्त अन्य कोणाच्याही संपर्कात आलेले नाहीत. त्याच जहाजावर असलेल्या अन्य देशांतील खलाशांना लसीकरणाची अट चीनने घातलेली नाही. त्यामुळे भारताची व्यापारकोंडी करण्याचा हा प्रयत्न तर नाही ना, अशी शंका सांगळे यांनी व्यक्त केली.

...........

अडवणूक अशी...

सागरी व्यापार क्षेत्रात सेवा देणाऱ्या भारतीय खलाशांची संख्या सर्वाधिक म्हणजे ८० टक्के इतकी असली तरी जागतिक बाजारपेठेवर चीनची हुकूमत आहे. कच्च्या किंवा तयार मालाच्या वाहतुकीच्या माध्यमातून शिपिंग कंपन्यांना सर्वाधिक व्यवसाय तेथूनच मिळतो. त्यामुळे चिनी सरकाच्या आदेशाचे पालन केल्यावाचून कंपन्यांसमोर पर्याय नाही. त्यामुळे बहुतांश कंपन्यांनी भारतीय खलाशांची चीनमधील सेवा स्थगित केली आहे. काहींनी तर त्यांना पुन्हा मायदेशी पाठविण्यास सुरुवात केली असून, नव्याने रुजू होणाऱ्यांना काही महिने वाट पाहण्याचा सल्ला दिला आहे.

...........

चीनच्या या आडमुठ्या धोरणाविरोधात आम्ही डी.जी. शिपिंग, नौवहनमंत्री, तसेच परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडे तक्रार दाखल केली आहे. संबंधित यंत्रणांनी या प्रकरणाची तत्काळ दखल घेऊन तोडगा काढावा. अन्यथा भारतीय खलाशांना नोकऱ्या गमावाव्या लागतीलच, शिवाय सागरी व्यापार क्षेत्रातील आपले महत्त्व कमी होईल.

- अभिजित सांगळे, कार्याध्यक्ष, ऑल इंडिया सिफेरर्स युनियन