जलवाहतुकीलाही बसला फटका
By admin | Published: November 18, 2016 02:34 AM2016-11-18T02:34:49+5:302016-11-18T02:34:49+5:30
केंद्राकडून घेण्यात आलेल्या नोटा बंद करण्याच्या निर्णयानंतर जल-वाहतुकीलाही त्याचा मोठा फटका बसला आहे.
मुंबई : केंद्राकडून घेण्यात आलेल्या नोटा बंद करण्याच्या निर्णयानंतर जल-वाहतुकीलाही त्याचा मोठा फटका बसला आहे. मुंबईतील गेट-वे आॅफ इंडियाजवळून एलिफंटा, अलिबागला जाणाऱ्यांची संख्या रोडावली असून त्यामुळे ४0 टक्के सेवा कमी झाल्या आहेत. त्याचा परिणाम म्हणून जल-वाहतुकदारांच्या उत्पन्नांवर परिणाम होऊ लागला. वाहतूकदारांकडून जुन्या नोटा न स्विकारण्याचा निर्णय आणि त्यातच सुट्या पैशांची चणचण त्यामुळेच हा फटका बसत आहे.
गेट-वे आॅफ इंडिया हे पर्यटकांचे प्रमुख आकर्षणाचे केंद्र आहे. येथे मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. गेट वे पाहण्यासाठी येताच अनेक पर्यटक एलिफंटा किंवा अलिबाग पाहण्यासाठी येथूनच बोटींचा पर्याय निवडतात. एलिफंटा, अलिबाग, मांडवाला जाण्यासाठी जवळपास ९0 बोटी गेट वे आॅफ इंडिया येथून सुटतात. साध्या बोटसाठी ८0 रुपये, तर इकॉनॉमी लॉंचेसाठी १४५ आणि लक्झरी बोटसाठी १८0 रुपये आकारले जातात. तर लहान मुलांसाठी ९५ रुपये ते १२५ रुपये आकारण्यात येतात. प्रत्येक बोटमधून जवळपास ४0 ते ५0 जणांची वाहतूक होते. मात्र केंद्राच्या निर्णयानंतर या जलवाहतुकीवर परिणाम होण्यास सुरुवात झाली. जल-वाहतुकदारांनी जुन्या नोटा न घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर पर्यटकांमध्ये मात्र गोंधळ निर्माण झाला. जुन्या नोटांमुळे जल वाहतुकीचा आनंद लुटता येत नसल्याने पर्यटकांनीही त्याकडे पाठ फिरवण्यास सुरुवात केली. मात्र पर्यटकांची नाराजी ओढवली तर वाहतुकीवर परिणाम होईल यामुळे जलवाहतुकदारांनी जुन्या नोटा घेण्याचा निर्णय घेतला. परंतु सुट्या पैशांचीही चणचण वाहतुकदारांबरोबरच पर्यटकांनाही भासू लागल्याने एकूणच या सेवेवर मोठा परिणाम होण्यास सुरुवात झाली. दिवसाला ४0 टक्के सेवा कमी चालतात आणि त्यामुळे सध्या दिवसाला होणारे उत्पन्न हे ८ नोव्हेंबरपूर्वी प्रत्येक दिवशी होणाऱ्या उत्पन्नापेक्षाही कमी होत गेले. नोटांची स्थिती हीच राहिल्यास पर्यटकांकडून आणखी पाठ फिरवली जाईल, अशी भिती जल-वाहतुकदारांकडून व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी)