Join us

शिर्डी संस्थान राष्ट्रवादीला, पंढरपूर देवस्थान काँग्रेसकडे; महामंडळांच्या वाटपाचे सूत्रही ठरले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2021 8:34 AM

समन्वय समितीची बैठक; महामंडळांच्या वाटपाचे सूत्रही ठरले

मुंबई : शिर्डीच्या श्री साईबाबा संस्थानचे अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसला तर पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुख्मिणी देवस्थानचे अध्यक्षपद काँग्रेसला देण्यात येणार आहे. मुंबईतील श्री सिद्धीविनायक ट्रस्टचे अध्यक्षपद हे शिवसेनेकडेच कायम राहील. महाविकास आघाडीच्या समन्वय समितीच्या बैठकीत मंगळवारी यासोबतच महामंडळाच्या वाटपांचे सूत्रदेखील निश्चित करण्यात आल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली.

आघाडी सरकारच्या काळात १५ वर्षे शिर्डी संस्थानचे अध्यक्षपद हे काँग्रेसकडे तर पंढरपूच्या संस्थानचे अध्यक्षपद हे राष्ट्रवादीकडे होते. मात्र त्यात पहिल्यांदाच अदलाबदल करण्यात आला आहे. शिर्डी संस्थानमध्ये प्रत्येकी सहा विश्वस्तपदे ही राष्ट्रवादी आणि काँग्रेसला तर पाच विश्वस्तपदे ही शिवसेनेला देण्यात येणार आहेत.

राज्यात १५० महामंडळे, प्रमुख समित्या, प्राधिकरणे आणि आयुक्तालये आहेत. त्यांच्यावरील नियुक्त्या करताना शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसला द्यावयाच्या पदांचे सूत्रही ठरले. तिन्ही पक्षांनी आपापली नावे निश्चित करावीत आणि समन्वय समितीची लवकरच बैठक घेऊन त्यावर शिक्कामोर्तब केले जाईल, असेही आजच्या बैठकीत ठरले.

आजच्या बैठकीला शिवसेनेतर्फे उद्योग मंत्री सुभाष देसाई, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीतर्फे उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि काँग्रेसतर्फे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व बांधकाम मंत्री अशोक चव्हाण उपस्थित होते. काही महामंडळांचे वाटप आजच्या बैठकीत ठरले. अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील. आमदारांच्या संख्येनुसार महामंडळे ठरविली जातील. महाविकास आघाडीत विसंवाद  नाही, गैरसमजही नाहीत. आ. प्रताप सरनाईक यांच्या पत्रावर बैठकीत चर्चा झाली नाही.

शिर्डी संस्थान अध्यक्षपदी आ. आशुतोष काळे, उपाध्यक्ष मिर्लेकर

शिर्डीच्या श्री साईबाबा संस्थानच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांची तर उपाध्यक्षपदी शिवसेनेचे माजी आमदार रवींद्र मिर्लेकर यांची नियुक्ती करण्याचा निर्णय झाला आहे. पंढरपूर संस्थांचे अध्यक्ष आणि विश्वस्तांची नावे, कोणत्या पक्षाला किती पदे द्यायची हे विधिमंडळाच्या अधिवेशनानंतर ठरविण्यात येणार आहे, असेही सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :शिर्डीपंढरपूरराष्ट्रवादी काँग्रेसकाँग्रेस